मराठवाड्यात अवघा १.८० टक्के जलसाठा; सुमारे ५१ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 08:21 PM2019-05-27T20:21:27+5:302019-05-27T20:24:33+5:30

मान्सून लांबण्याच्या शक्यतेने अडचणीत वाढ 

Only 1.80% water stock in Marathwada; About 51 lakh people are depend on tanker water | मराठवाड्यात अवघा १.८० टक्के जलसाठा; सुमारे ५१ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर 

मराठवाड्यात अवघा १.८० टक्के जलसाठा; सुमारे ५१ लाख नागरिक टँकरच्या पाण्यावर 

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात ९ वर्षांपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. मधली एक- दोन वर्षे सोडली तर पूर्ण दशक दुष्काळी गणले जाण्याची शक्यता आहे. हवामान खाते आणि अभ्यासक यावर्षीही कमी पाऊस असल्याचे सांगत आहेत. 

गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे यावर्षी जलसाठ्यांची भूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विभागातील सर्व लहान-मोठ्या ८७२ प्रकल्पांत १.८० टक्के पाणी सध्या शिल्लक आहे. मागील ५ वर्षांत पहिल्यांदाच विभागातील प्रकल्पांतील पाणीपातळी घटली आहे. समाधानकारक पाऊस झाला नाहीतर हे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरणे अशक्यप्राय आहे. विभागात ७५ मध्यम प्रकल्प आहेत. मागील तीन वर्षांत सर्वाधिक कमी पाणीसाठा या प्रकल्पांत शिल्लक आहे. २०१७ मध्ये १७ टक्के, २०१८ मध्ये १४ टक्के तर २०१९ मध्ये फक्त २ टक्के पाणी मध्यम प्रकल्पात शिल्लक आहे. विभागात ७४९ लघु प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत मागील तीन वर्षांच्या तुलनेत केवळ २ टक्के पाणी आहे. २०१७ मध्ये ११ टक्के, २०१८ मध्ये १२ टक्के, २०१९ मध्ये २ टक्के पाणी प्रकल्पात आहे. लघु आणि मध्यम प्रकल्पांवर ग्रामीण भागांची तहान बऱ्यापैकी भागते. परंतु या प्रकल्पांत पाणीच नसल्यामुळे ग्रामीण भागात टँकरशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी दुसरा पर्याय शिल्लक नाही.

५१ लाखांच्या आसपास नागरिकांना ३,१६३ च्या आसपास टँकरने पाणीपुरवठा सध्या सुरू आहे. २,२३१ गावांत आणि ७८१ वाड्यांमध्ये टँकरने पाणी पुरविले जात आहे. ५,३२१ विहिरींचे अधिग्रहण विभागात करण्यात आले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबादमध्ये टँकरचा आकडा मोठा आहे. जालन्यात ६०६ तर औरंगाबादमध्ये १,१२३ टँकर सुरू आहेत. 

या दोन जिल्ह्यांतच विभागाच्या एकूण टँकरच्या संख्येच्या तुलनेत ६० टक्के टँकर सुरू आहेत. यावर्षीच्या उन्हाळ्यात विभागातील मोठ्या ११ प्रकल्पांतील २.५२५९ दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे. यामुळे अनेक लघु प्रकल्पांतील शिल्लक असलेले पाणीही आटले. मोठ्या प्र्रकल्पांपैकी सर्वाधिक बाष्पीभवन जायकवाडी प्रकल्पातील पाण्याचे झाले आहे. जायकवाडीतून जवळपास एक दशलक्ष घनमीटर पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

महाराष्ट्रात १५ जूनला मान्सूनचे आगमन हवामानाचे अभ्यासक प्रा.किरणकुमार जोहरे यांनी सांगितले, यंदा मान्सून लांबण्याची शक्यता आहे. आयएमडी मान्सूनचे आगमन झाल्याचे सांगत असले तरी केरळपर्यंत मान्सून येण्यास ८ ते १० दिवस लागतील.महाराष्ट्रात १५ जूनच्या आसपास मान्सूनचे आगमन होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या पेरणीसाठी लगेच घाई करू नये. 

Web Title: Only 1.80% water stock in Marathwada; About 51 lakh people are depend on tanker water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.