फक्त २ लाख वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2017 12:35 AM2017-07-14T00:35:05+5:302017-07-14T00:43:20+5:30
औरंगाबाद : मराठवाड्यातील वन महोत्सवात शिक्षण व जलसंपदा विभागाने संपूर्णत: उदासीनता दाखविली
स.सो. खंडाळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : मराठवाड्यातील वन महोत्सवात शिक्षण व जलसंपदा विभागाने संपूर्णत: उदासीनता दाखविली. मराठवाड्यातील ४० लाख शालेय मुला-मुलींनी प्रत्येकी एक झाड या हिशेबाने ४० लाख झाडे लावावीत, अशी अपेक्षा होती; परंतु प्रत्यक्षात एवढ्या मोठ्या संख्येकडून १ लाख ९० हजार एवढी कमी झाडे लावली गेली. ही एक शोकांतिकाच मानली जात आहे, हीच गत जलसंपदा विभागाची झाली. कालव्याच्या बाजूने वा अन्यत्र फार मोठ्या प्रमाणावर झाडे लावण्याची अपेक्षा असताना जलसंपदा विभागाने मात्र वृक्ष लागवडीकडे पाठ फिरविली. त्यांना झाडे लावण्याचा कार्यक्रम अजिबात महत्त्वाचा वाटला नाही.
आता आव्हान उभे ठाकणार आहे, ते लावलेली झाडे जगवण्याचे! सुमारे ५० ते ६० टक्के झाडे वन विभाग व सामाजिक वनीकरणाने जगवावीत, हे गृहीतच आहे. याशिवाय वृक्षसंवर्धनासाठीच पुढे आलेल्या ग्रीन आर्मीच्या १२ लाख १३ हजार सदस्यांकडून वृक्षसंवर्धन केले जाईल. मनरेगामधूनही ही झाडे जगवली जाणार आहेत. तसेच विविध स्वयंसेवी संस्था, महाविद्यालयांनी संवर्धनाची काळजी घ्यावी, असे अपेक्षित
आहे.
मराठवाड्यात मुळातच ४.८३ टक्के एवढे वनक्षेत्र आहे. ते वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. हे लक्षात घेऊन प्रशासन कामाला लागलेले दिसले. यासाठी स्वत: विभागीय आयुक्त मराठवाडाभर फिरले. कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळा घेतल्या. मोटिव्हेशन वाढवले.
शिक्षण विभागासाठीही औरंगाबादेत कार्यशाळा घेतली; पण शिक्षण विभागाने वृक्षलागवडीत अजिबात रुची दाखवली नाही. ‘आमची शाळा... आमची टेकडी...’ अशा सुंदर कल्पनेलाही शाळांनी दाद दिली नाही. मराठवाड्यात शंभर टक्के यश मिळवण्यासाठी दोनशे टक्के श्रम करावे लागतात. अन्य विभागात शंभर टक्के श्रम केल्यास दोनशे टक्के यश मिळत असते, याचा प्रत्यय या वृक्षलागवड कार्यक्रमाने दिला. तरीही मराठवाड्याने १३९ टक्केवृक्षलागवड केल्याने अभिनंदन होत आहे.