नाथसागरात २१ टक्केच पाणीसाठा; पैठणमध्ये होतोय ८२ टँकरने पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 08:00 PM2018-12-31T20:00:36+5:302018-12-31T20:03:26+5:30
पैठण तालुक्यात ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था येथील गावांची झाली आहे.
- समीर पठाण
जायकवाडी : नाथसागर धरणातील पाणी झपाट्याने कमी होत आहे. सध्या साठा २१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे औरंगाबाद, जालन्यासह उद्योगांना पाणीकपातीचा सामना करावा लागेल हे जवळपास निश्चित आहे. मार्चमध्ये धरण मृतसाठ्यात जाणार असल्याने पाणीबाणीचा सामना करावा लागेल. विशेष म्हणजे पैठण तालुक्यात ‘धरण उशाला अन् कोरड घशाला’ अशी अवस्था येथील गावांची झाली आहे. आजघडीला ८२ खेड्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून, मोठ्या प्रमाणात टँकर सुरू करण्याची मागणी होत आहे.
जायकवाडी धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील औरंगाबाद, जालन्यासह परळी विद्युत प्रकल्प, चार हजार उद्योग, तर नगर जिल्ह्यातील काही भागाला पाणीपुरवठा करण्यात येतो. मात्र, यंदा कमी पर्जन्यमानामुळे हिवाळ्यातच जायकवाडी धरणातील पाणीसाठा २१ टक्क्यांपर्यंत खाली गेला आहे. त्यामुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणात पाणीकपातीची शक्यता आहे. जायकवाडी धरणाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मार्चपर्यंत पिण्यासाठी धरणातील पाणी मिळणार आहे. मात्र, यानंतर मृतसाठ्यातून पाणी उपसा करण्याची वेळ येणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली आहे.
जायकवाडी धरणाचा पाणीसाठा यंदाच्या पावसाळ्यात ४६ टक्के एवढा झाला होता. त्यातही शेतीला सलग पाणीपुरवठा करण्यात आल्याने आता धरणात केवळ २१ टक्केपाणी असून, याच पाण्यात येत्या पावसाळ्यापर्यंत तहान भागवावी लागणार आहे.नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणांतून पाणी सोडले असले तरी ८.९९ पैकी केवळ ४.६० टीएमसी पाणीच जायकवाडीत पोहोचले आहे, अशी माहिती येथील अधिकाऱ्यांनी दिली.
७५ गावांची तहान टँकरवर
पैठण तालुक्यात ७५ गावांना ८२ टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. दिवसेंदिवस पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी पंचायत समितीला मोठ्या प्रमाणात प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे पुढील काही महिन्यांत टँकरचा आकडा शंभरी पार करील, अशी शक्यता आहे.
जायकवाडीत बिगर सिंचन पाणीपुरवठा
जायकवाडी धरणातील दरवर्षी जवळपास ३२७ दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर होतो. त्यात पिण्यासाठी १०५ दशलक्ष घनमीटर, औद्योगिक वसाहती ३४ दशलक्ष घनमीटर, तर परळी औष्णिक विद्युत प्रकल्प १८८ दशलक्ष घनमीटर पाण्याचा समावेश आहे, तर एमआयडीसीला दररोज ५०.५ एमएलडी पाणीपुरवठा होता. त्यात वाळूज एमआयडीसीसाठी ३५ एमएलडी, चिकलठाणा ८ एमएलडी, शेंद्रा एमआयडीसी ५.२५ एमएलडी, जालना एमआयडीसी ०.८० एमएलडी, तर १ टीएमसी माजलगाव धरणासाठी पाणीपुरवठा झाला.
मार्च अखेर मृतसाठा गाठणार
जायकवाडी धरणात सध्या २१ टक्केपाणीसाठा शिल्लक असून पाणीवाटप धोरणानुसार २२ तारखेपासून सध्या उजव्या कालव्यातून माजलगाव धरणाला १ टीएमसी पाणी सोडण्यात येत आहे. मार्चअखेरपर्यंत धरणाचा पाणीसाठा मृतसाठ्यात जाईल, अशी माहिती जायकवाडी धरणाचे शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.