शेतीमाल आवक केवळ २५ टक्के
By Admin | Published: November 8, 2015 11:44 PM2015-11-08T23:44:49+5:302015-11-08T23:44:49+5:30
रमेश शिंदे , औसा पावसाअभावी यंदा शेतकरी संकटात सापडले आहेत़ त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले व्यवसायही संकटात सापडले आहेत़ पाऊस नसल्याचा फटका
रमेश शिंदे , औसा
पावसाअभावी यंदा शेतकरी संकटात सापडले आहेत़ त्यामुळे शेतीवर अवलंबून असलेले व्यवसायही संकटात सापडले आहेत़ पाऊस नसल्याचा फटका जसा शेतकऱ्यांना बसला तसा तो आडत बाजारासही बसला आहे़ दिवाळीच्या पूर्वसंध्येला येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सुनसान असल्याचे शुक्रवारी पहावयास मिळाले़ दिवसभरात केवळ ४१० क्विंटल शेतीमालाची आवक झाली होती़
मागील आठ-दहा वर्षांपासून औसा कृषी उत्पन्न बाजार समिती नावारूपाला आली आहे़ या बाजार समितीत महिन्याला हजारो क्विंटल आवक राहायची़ पण यावर्षी मात्र ही आवक २५ टक्क्यांवरच आली आहे़ मागील वर्षी आॅक्टोबर महिन्यात १८ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होती़ ती यावर्षी केवळ ६ हजार ५०० क्विंटलवर आली आहे़ मागील वर्षी दिवाळीच्या पूर्वसंध्येला सर्व प्रकारच्या शेतीमालाची आवक ३ हजार ५०० क्विंटलची होती़ ती आज केवळ ४१० क्विंटल आहे़
शुक्रवारी औशाच्या आडत बाजारात केवळ ४१० क्विंटल मालाची आवक होती़ यामध्ये सोयाबीन ३३५, हरभरा ३, हायब्रीड ४३, पिवळी २४, करडी २, सूर्यफूल ३ क्विंटल अशी आवक होती़ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये ५४ आडत दुकाने आहेत़ विशेष म्हणजे मालाची आवकच नसल्याने काही आडत दुकाने बंद असल्याचे विदारक चित्र पहायला मिळाले़ हजारो क्विंटल आवक असणाऱ्या या बाजार समितीमधीलआवक सध्या मात्र शेकड्यात आली आहे़
यासंदर्भात बाजार समितीचे सचिव शाम कुलकर्णी म्हणाले, मागील काही वर्षांपासून आमच्या बाजार समितीत हजारो क्विंटल शेतीमालाची आवक होत होती़ ती आता शेकड्यावर आली आहे़ त्यामुळे यावर्षी ३५ ते ४० टक्केही उत्पन्न होते की नाही, अशी शंका आहे़ त्यामुळे आर्थिक उलाढाल थंडावली आहे़ दुष्काळी परिस्थितीचा हा परिणाम आहे़