औरंगाबाद जिल्ह्यातील फक्त ३ हजार शेतकरी कुटुंबे निश्चित उत्पन्नास पात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 07:13 PM2019-02-19T19:13:15+5:302019-02-19T19:13:45+5:30
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी आहे योजना
औरंगाबाद : शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील फक्त ३ हजार शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत प्रती शेतकरी कुटुंबाला प्रतिवर्ष ६ हजार रुपये इतके आर्थिक साहाय्य ३ टप्प्यांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेच्या आढावा कृषी, जलसंधारण व रोहयो विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी सोमवारी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे घेतला. यावेळी अपर आयुक्त डॉ. विजयकुमार फड, निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, एनआयसीचे जिल्हा समन्वयक थोरात यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
या योजनेच्या अंमलबजावणीविषयी अपर आयुक्त डॉ. फड म्हणाले, या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील १३५५ गावांचा समावेश आहे. ८ अ प्रमाणे एकूण खातेदार शेतकऱ्यांची संख्या ७ लाख १७ हजार १७९ एवढी आहे. माहिती संकलित झालेल्या गावांची संख्या १ हजार १४२ एवढी असून माहिती परिपूर्ण असलेल्या पात्र कुटुंबांची संख्या ४८ हजार ९०३ एवढी आहे.