साडेतीन हजार पोलिसांसाठी अवघी ३२९ वाहने; आरोपींची ने-आण करण्यासाठी वाहनांची प्रतीक्षा
By सुमित डोळे | Published: August 17, 2024 08:09 PM2024-08-17T20:09:52+5:302024-08-17T20:10:29+5:30
४० टक्के वाहने द्यावी लागतात अन्य विभागांच्या कामकाजासाठी, ७५ वाहनांची गरज
छत्रपती संभाजीनगर : कायदा, सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलिस विभागात वाहनांची वानवा निर्माण झाली आहे. जवळपास साडेतीन हजार पोलिसांसाठी अवघी ३२९ वाहने आहेत. त्यापैकी ४० टक्के वाहने अन्य विभागांना वापरण्यासाठी दिली आहेत. परिणामी, ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना शासकीय कामांसाठी तासन् तास प्रतीक्षा करावी लागते आहे.
पोलिस विभागाकडील बहुतांश वाहने अत्यंत खराब अवस्थेत आहेत. दहा वर्षांपेक्षा अधिक वापर झालेली वाहने ‘खटारा’ बनली असून पोलिसांनाच धक्का मारून चालू करावी लागतात. नुकतेच एका ठाण्यातील अधिकाऱ्याला गुन्हेगारांना न्यायालयात हजर करायचे होते. दुपारी ३.३० वाजल्यानंतरही त्यांना वाहन उपलब्ध झाले नव्हते. मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने ठाण्यातील इतर वाहने बंदोबस्तात पाठवली होती. उशीर झाल्यावर न्यायालयात काय उत्तर द्यावे, या प्रश्नाने अधिकारी चांगलाच वैतागला होता. शहरातील ७० टक्के पोलिस ठाण्यांची हीच अवस्था आहे. डायल ११२ च्या वाहनांचा वापरही अन्य कामांसाठी करण्यास बंदी असल्याने अनेकदा स्वत:च्या वाहनात गुन्हेगारांची ने-आण करावी लागते.
अशी आहे वाहनांची संख्या
शहर पोलिस
एकूण वाहने - सुस्थितीत - निकामी
दुचाकी - २३३ - १५८ - ९७ चारचाकी - २६५ - १७१ - ७५ --
जिल्हा पोलिसांकडे २९५ वाहने
जिल्हा पोलिसांकडे देखील वाहनांची वानवा आहे. असलेली सर्व वाहने सुस्थितीत आहे. एकूण २९५ वाहनांपैकी १४८ चारचाकी तर १४७ दुचाकी आहेत.
४० टक्के वाहने इतरांसाठी
शहर पोलिसांच्या ३२९ वाहनांपैकी ४० टक्के वाहने एसीबी, सीआयडी, नागरी हक्क सुरक्षा विभाग, रेल्वे पोलिस, एटीएस, विशेष सुरक्षा पथक, लोहमार्ग पोलिस वापरतात.
७५ वाहनांची गरज
छत्रपती संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाची स्थापना १९ ऑक्टोबर १९९१ ला झाली. या ३३ वर्षांत १८ पाेलिस ठाणी, गुन्हे शाखा, सुरक्षा विभाग, पासपोर्ट विभाग, भराेसा सेल, पर्यटक सुरक्षा विभाग, दामिनी पथक अशी सहा पथके वाढली. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या साडेतीन हजारांच्या घरात आहे. वाहने मात्र वाढलीच नाहीत. सध्या ७२ वाहनांची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
जूनमध्ये मिळाली ४ कोटींची वाहने
जून, २०२३ मध्ये पोलिसांना ४ कोटी १६ लाखांची ८ स्कॉर्पिओ, १८ बोलेराे, १ टेम्पो, ५ मिनी सियाज, १७ आसनांची ४ वाहने मिळाली. यापैकी बहुतांश वाहने वरिष्ठ अधिकाऱ्यांना गेली. ठाण्यांच्या नियमित कामांसाठी पुरेशी वाहने नाहीत.
६९ वाहनांसाठी प्रयत्न
पोलिस वाहनांचा २४ तास वापर होतो. गतवर्षी जिल्हा नियोजन निधीतून वाहने मिळाली होती. अजून ६९ वाहनांसाठी प्रस्ताव पाठवला असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- शिलवंत नांदेडकर, पोलिस उपायुक्त, मुख्यालय.