बॅकवॉटर क्षेत्रात फक्त ४ तास वीज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2019 07:28 PM2019-01-25T19:28:22+5:302019-01-25T19:28:39+5:30
पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना दिवसातून अवघा चार तासांचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
औरंगाबाद : जायकवाडी जलाशयात अवघा २१.८५ टक्के दलघमी पाणीसाठा शिल्लक असून, भविष्यात निर्माण होणारी गंभीर पाणीटंचाई लक्षात घेता पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना दिवसातून अवघा चार तासांचा विद्युत पुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
यासंदर्भात महावितरणचे अधीक्षक अभियंता (ग्रामीण) संजय आकोडे यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तीन दिवसांपासून पैठण, गंगापूर आणि वैजापूर या तीन तालुक्यांतील जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रातील कृषिपंपांना चार तास विद्युत पुरवठा केला जात आहे. यंदा औरंगाबाद जिल्ह्यात अत्यल्प पाऊस झाल्यामुळे जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकºयांकडून अवैधरीत्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा सुरू आहे. मध्यंतरीच्या काळात जलसंपदा विभाग, महसूल विभाग, पोलीस विभाग आणि महावितरणच्या अधिकारी- कर्मचाºयांच्या संयुक्त पथकामार्फत अवैधरीत्या पाणी उपसा करणाºया शेतकºयांची वीज जोडणी तोडण्यात आली होती. त्यामुळे काही प्रमाणात पाणी उपसा कमी झाला होता.
सध्या जायकवाडी जलाशयात २१.८५ टक्के दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे. भविष्यात तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून नवीन पाणीसाठा उपलब्ध होईपर्यंत हा पाणीसाठा सांभाळून ठेवण्याची गरज आहे. यासाठी बॅक वॉटर क्षेत्रातील अधिकृत व अनधिकृत पाणी उपसा करणारांवर प्रतिबंध घालण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जलसंपदा विभाग व महावितरणच्या अधिकाºयांना दिले आहेत. यावर उपाय म्हणून जायकवाडी बॅक वॉटर क्षेत्रात भारनियमन करून त्याठिकाणी कृषिपंपांसाठी दररोज अवघे चार तासच वीजपुरवठा सुरू ठेवण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.