गुणवत्तेसाठी घेतलेल्या शिक्षक प्रेरणा परीक्षेला १७ हजार ८७७ पैकी केवळ ४५७ जणांची हजेरी
By राम शिनगारे | Published: July 30, 2023 08:37 PM2023-07-30T20:37:48+5:302023-07-30T20:37:58+5:30
१७,४२० गुरूजींची प्रेरणा परीक्षेला दांडी ; शिक्षकांनाच गुणवत्तेचे वावडे
छत्रपती संभाजीनगर : विभागीय आयुक्तालयाकडून गुणवत्ता सुधारण्यासाठी ‘ शिक्षक प्रेरणा परीक्षा ’ घेण्याचे नियोजन केले आहे. ऐच्छिक असणारी ही परीक्षा पहिली ते बारावीच्या शिक्षकांसाठी होती. औरंगाबाद जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि खासगी शाळांमधील एकूण १७ हजार ८७७ शिक्षकांपैकी केवळ ४५७ जणांनी परीक्षा दिली. या परीक्षेसाठी ३ हजार १८९ जणांनी नोंदणी केली होती. त्यातील बहुतांश जणांनी परीक्षा केंद्राकडे पाठ फिरवली. एकूण शिक्षकांच्या तुलनेत केवळ ३.८० टक्के शिक्षकांनी हजेरी लावली. या प्रकारामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनाच गुणवत्तेचे वावडे आहे का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
मराठवाड्यातील शैक्षणिक गुणवत्ता ढासळली असल्याचे नुकतीच सेवानिवृत्ती घेतलेले विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले होते. त्यामुळे आयुक्त केंद्रेकर यांनी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यातील जिल्हा परिषद व १०० टक्के खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.
या निर्णयानुसार ही परीक्षा ऐच्छिक स्वरुपांची ठेवण्यात आली. अशा पद्धतीची परीक्षा घेण्यास विविध शिक्षक संघटनांनी विरोध करीत बहिष्कार टाकण्याचा घोषणा केली होती. त्यातच केंद्रकर यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे परीक्षेचे काय होणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड नियोजित वेळेनुसारच परीक्षा घेण्याचे प्रशासनाला आदेश दिले. त्यानुसार मराठवाड्यातील आठ जिल्ह्यात ९३ केंद्रावर पहिल्या दिवशी परीक्षा पार पडली.
औरंगाबाद जिल्ह्यातील एकूण ११ केंद्रावर परीक्षेसाठी १७ हजार ८७७ शिक्षकांपैकी ३ हजार १८९ जणांनी नोंदणी केली. १४ हजार ६८८ शिक्षकांनी परीक्षेसाठी नकार दर्शविला. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्यांपैकी केवळ ४५७ शिक्षकांनी पहिल्या दिवशीच्या शेवटच्या पेपर पर्यंत हजेरी लावली. त्यामुळे गुणवत्तेसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील तब्बल १७ हजार ४२० शिक्षकांनी दांडी मारल्याचे स्पष्ट झाले.