औरंगाबाद जिल्ह्यात रबीची 50.67 टक्केच पेरणी; ज्वारीपेक्षा गहू, हरभऱ्याचा वाढला पेरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 12:13 PM2020-12-09T12:13:13+5:302020-12-09T12:14:24+5:30
सर्वाधिक कडधान्याचा पेरा हा बीड जिल्ह्यात झालेला आहे.
औरंगाबाद : कृषी संचालक कार्यालयांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद, जालना व बीड जिल्ह्यात रबीची ८१.५७ टक्के पेरणी, तर औरंगाबाद जिल्ह्यात केवळ ५०.६७ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. कडधान्याचा पेरा सरासरीपेक्षा वाढला असून, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाण्याची उपलब्धता अधिक असल्याने रबी ज्वारीचा पेरा घटून हरभरा व गव्हाचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे.
तीन जिल्ह्यांत सरासरी १ लाख ६९ हजार ६६६ पैकी १ लाख ८४ हजार ५५३ हेक्टर क्षेत्रावर १०८.७७ टक्के कडधान्याची पेरणी झाली आहे. सर्वाधिक कडधान्याचा पेरा हा बीड जिल्ह्यात झालेला आहे. बीडमधील तब्बल १३५.९३ टक्के हरभऱ्यासह अन्य कडधान्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात कडधान्याचे सरासरी ८१ हजार १५४ हेक्टर क्षेत्र असून, १ लाख १० हजार ३११ हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. जालना जिल्ह्यात सरासरी ४२ हजार ५६८ हेक्टर असूून, पैकी ४८ हजार ६०७ हेक्टरवर म्हणजे ११४.१९ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ४५ हजार ९४४ हेक्टर क्षेत्रापैकी २५ हजार ६३५ हेक्टरवर हरभरा आदी कडधान्याची ५५.८० टक्के पेरणी झाली आहे. थंडी वाढल्याने रबीच्या उर्वरित क्षेत्रावरही गहू आणि हरभरा पेरणी पुढील काही दिवसांत होईल, असा अंदाज कृषी विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
प्रत्यक्ष पेरणी आणि आकडेवारीत तफावत
औरंगाबाद जिल्ह्यात ३ डिसेंबरपर्यंत केवळ ५०.६७ टक्के पेरणी झाल्याचे कृषी विभागाच्या आकडेवारीवरून दिसते. प्रत्यक्षात पेरणी ८० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्याच्या पाहणीतच विरोधाभासी चित्र दिसून आले आहे. त्यामुळे विभागाला आकडेवारी पुरवणारी यंत्रणा योग्य आकडेवारी पुरवण्यात दिरंगाई करतेय का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. बीड व जालना जिल्ह्यातून आकडेवारी सद्य:स्थितीनुरूप जुळून येत आहे.