५४ टक्के शेतकऱ्यांच्याच खात्यात पडली मदत
By Admin | Published: February 17, 2016 11:10 PM2016-02-17T23:10:38+5:302016-02-17T23:15:36+5:30
परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले खरीप नुकसानीचे अनुदान १७ फेब्रुवारीपर्यंत ५४ टक्के शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा झाले आहे.
परभणी : जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शासनाने दिलेले खरीप नुकसानीचे अनुदान १७ फेब्रुवारीपर्यंत ५४ टक्के शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा झाले आहे. अनुदान वाटपासाठी १५ सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र अजूनही ४६ टक्के शेतकऱ्यांना अनुदानासाठी प्रतीक्षाच करावी लागणार आहे.
जिल्ह्यात तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील वर्षी सरासरीच्या ४५ टक्के पाऊस झाल्याने खरीप हंगामात शेतकऱ्यांना नुकसानीचा सामना करावा लागला. खरिपातील पिके उगवलीच नाहीत. परिणामी जिल्ह्यातील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. जिल्हा प्रशासनाने काढलेल्या आणेवारीनुसार परभणी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आणि या गावातील शेतकऱ्यांना शासनाने थेट आर्थिक मदत देऊ केली. जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात परभणी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी १११ कोटी ८० लाख रुपयांची मदत जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली. त्यामुळे शेतकरी ही मदत खात्यावर कधी जमा होते, याची प्रतीक्षा करीत आहेत.
दरम्यान, विभागीय आयुक्तांनी खरीपाचे अनुदान जिल्हा प्रशासनाकडे वर्ग करताना अनुदान वाटपासाठी ठराविक कार्यक्रम आखून दिला होता. या कार्यक्रमानुसार १५ फेब्रुवारीपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीची रक्कम जमा करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यात कामही सुरू झाले. १७ जानेवारी रोजी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ९९ शेतकऱ्यांच्या खात्यावर ६० कोटी ६ लाख रुपयांची रक्कम जमा करण्यात आली होती. आणखी ५१ कोटी ३५ लाख रुपये वाटप होणे शिल्लक आहे. त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर खरीप अनुदान जमा होण्यासाठी मार्च महिनाच उजाडतो की काय, अशी शक्यता निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)