जिल्ह्यात अवघे ५७६० हेक्टर वनक्षेत्र

By Admin | Published: March 26, 2017 11:10 PM2017-03-26T23:10:59+5:302017-03-26T23:12:14+5:30

उस्मानाबाद : वनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी विशेषत: मागील चार-पाच वर्षांपासून शासनामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत.

Only 5760 hectares of forest area in the district | जिल्ह्यात अवघे ५७६० हेक्टर वनक्षेत्र

जिल्ह्यात अवघे ५७६० हेक्टर वनक्षेत्र

googlenewsNext

उस्मानाबाद : वनाखालील क्षेत्र वाढावे यासाठी विशेषत: मागील चार-पाच वर्षांपासून शासनामार्फत विविध उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. असे असतानाही जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र अपेक्षित गतीने वाढताना दिसत नाही. आजही जिल्ह्यात केवळ ५७६० हेक्टर क्षेत्र वनाने व्यापलेले आहे. हे प्रमाण ०.८५ टक्के इतके आहे. जे राज्याच्या बराबरीने म्हणजेच किमान १६ ते २० टक्यांदरम्यान असणे अपेक्षित आहे.
राष्ट्रीय व राज्य धोरणानुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात राज्यात २० टक्के वनक्षेत्र आहे. तर जिल्ह्यात अवघे ०.८२ टक्के इतके अत्यल्प क्षेत्र वनाखाली आहे. दरम्यान, हे चित्र बदलण्यासाठी शासनामार्फत वन विभागाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम, योजना राबविण्यात येत आहेत. तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम हा त्याचाच एक भाग. गत पावसाळ्यात विविध शासकीय यंत्रणा, शाळा, महाविद्यालये, निमशासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकांच्या सहभागातून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. परंतु, अनेक संस्था, कार्यालयाकडून वृक्ष लागवड केल्यानंतर त्यांच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष केले जाते. परिणामी लागवड केलेल्या ठिकाणी रोपांऐवजी केवळ खड्डे उरल्याचे विदारक चित्र पहावयास मिळते. हे थोडके म्हणून की काय, आजही विशेषत: डोंगरी भागातील वनक्षेत्रांतर्गतच्या झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होताना दिसते. यासह आदी बाबींमुळे जिल्ह्यातील वनाखालील क्षेत्र अपेक्षित गतीने वाढताना दिसून येत नाही. सर्वाधिक विदारक स्थिती लोहारा तालुक्यात पहावयास मिळते. राखीव वनक्षेत्र केवळ १४७.९२ हेक्टर इतके अत्यल्प आहे. यापैकी अवघे ३८ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. एकूण वनाचा विचार केला असता, १८५.९२ हेक्टर क्षेत्र वृक्षांनी अच्छादित आहे.
दरम्यान, परंडा तालुक्याचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. केवळ २५३.७७ हेक्टर क्षेत्र वनाखाली आहे. यापैकी ११२.९५ हेक्टर क्षेत्रावर राखीव वन आहे. तर १३८.८२ टक्के संरक्षित वनक्षेत्र आहे. अवर्गीकृत वनक्षेत्र केवळ २ टक्के इतके अत्यल्प आहे. मोठा तालुका म्हणून उस्मानाबादची ओळख आहे. परंतु, वनक्षेत्राचा विचार करता, हा तालुका दुसऱ्या स्थानावर आहे. ८९६.७३ हेक्टर वनक्षेत्र आहे. यातील ६१२.७३ हेक्टर राखीव वनक्षेत्र तर २०३ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. दुष्काळी तालुका म्हणून ओळख असलेल्या भूम तालुक्यातही समाधानकारक स्थिती नाही. ६१६ हेक्टर क्षेत्र वनाखाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यातील ५५० हेक्टर राखीव वनक्षेत्र आहे. तर केवळ ६५ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. अवर्गीकृत वनक्षेत्र १ हेक्टर एवढे आहे. वाशी तालुक्याची अवस्थाही काही वेगळी नाही. ४४६ हेक्टर वनक्षेत्र आहे. ४२६ राखीव वनक्षेत्र असून २० हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. वाशी पेक्षाही कळंब तालुक्यात विदारक स्थिती आहे. अवघ्या ३७३ हेक्टर क्षेत्रावर वनक्षेत्र असून यापैकी १०२ हेक्टर राखीव वनक्षेत्र असून १९ हेक्टर संरक्षित वनक्षेत्र आहे. तर दुसरीकडे २५२ हेक्टर क्षेत्र हे वर्गीकृत वन म्हणून ओळखले जाते. उमरगा तालुक्यामध्येही वृक्ष लागवडीवर अधिकाअधिक भर देण्याची गरज आहे. तालुक्यात ५५८ हेक्टर वनक्षेत्र आहे. यापैकी ३४५ हेक्टर क्षेत्र हे राखीव वन म्हणून ओळखले जाते. तर ९० हेक्टर क्षेत्रावर संरक्षित वन आहे. आणि १२३ हेक्टर वनक्षेत्र अवर्गीकृत आहे.

Web Title: Only 5760 hectares of forest area in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.