अवघ्या ६ टक्के मालमत्तांमध्ये होतेय जलपुनर्भरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:31 PM2019-06-07T23:31:48+5:302019-06-07T23:32:04+5:30
यंदाच्या उन्हाळ्यात तर तीव्र पाणीटंचाई जाणवूनही औरंगाबादकर मात्र जलपुनर्भरणाबाबत उदासीनच असल्याचे दिसून आले.
औरंगाबाद : पाणीटंचाईवर मात करण्याच्या पर्यायांपैकी सर्वोत्तम पर्याय म्हणजेच जलपुनर्भरण किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग होय. अनेक जलतज्ज्ञ याबाबत नेहमी माहिती देतात आणि पर्यावरणप्रेमीही पाणी वाचवा म्हणतानाच ‘पाणी जिरवा’ असे कटाक्षाने सांगतात. असे असतानाही आणि यंदाच्या उन्हाळ्यात तर तीव्र पाणीटंचाई जाणवूनही औरंगाबादकर मात्र जलपुनर्भरणाबाबत उदासीनच असल्याचे दिसून आले.
महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहरात जवळपास ३ लाख मालमत्ता आहेत. मात्र, आतापर्यंत यापैकी केवळ १८ ते २० हजार मालमत्तांमध्येच जलपुनर्भरण योजना राबविण्यात आली आहे. टक्केवारी काढल्यास हे प्रमाण अवघे ५ ते ६ टक्के असल्याचेच दिसून येते.
ज्या घरांमध्ये जलपुनर्भरण योजना सुरू करण्यात आली आहे, अशा लोकांना महानगरपालिकेकडून मालमत्ता करात १० टक्के कर सवलत मिळते. याशिवाय अनेक सामाजिक संघटना कमीत कमी पैसे घेऊन जलपुनर्भरण योजना बसवून देत आहेत. एकदा हा प्रकल्प घरात बसविला की, अनेक वर्षे यासाठी पुन्हा काहीही पैसा खर्च करावा लागत नाही; परंतु असे असतानाही जलपुनर्भरण करणाºया मालमत्तांची संख्या न वाढणे खेदजनक आहे.
चौकट :
जलपुनर्भरणाचे प्रमाण झाले कमी
सकल मारवाडी मिडटाऊन महिला शाखेतर्फे मागील दोन वर्षांपासून जलपुनर्भरण उपक्रम राबविण्यात येतो. ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर या ग्रुपकडून काम केले जात असल्यामुळे अत्यंत कमी किमतीत हे काम केले जाते. याविषयी गु्रपच्या सदस्या पूनम सारडा म्हणाल्या की, मागच्या वर्षी जवळपास २५० घरांमध्ये उन्हाळ्याच्या दिवसांत हा उपक्रम सुरू करण्यात आला.
हे प्रमाण यावर्षी अत्यंत कमी झाले असून, यंदा अवघ्या ३० ते ३५ घरांमध्येच हा प्रकल्प सुरू करण्यात आला. कचरा प्रश्नाविषयी आता औरंगाबादकर जागरूक झाले आहेत; पण पाण्याच्या बाबतीत मात्र असूनही पाहिजे तेवढी जागरूकता आली नसल्याचेही सारडा यांनी सांगितले.
प्रीती भक्कड आणि भक्ती संकलेचा या ग्रुपच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षा असून जलपुर्नभरण या प्रकल्पासाठी सारडा यांच्यासह सुप्रिया सुराणा, भारती तोतला, अलका अग्रवाल प्रकल्प प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.