२० दिवसांत आरटीईचे केवळ ८५० प्रवेश निश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:03 AM2021-07-02T04:03:56+5:302021-07-02T04:03:56+5:30
--- औरंगाबाद : पालकांनी शाळेत जाऊन आरटीईतून प्रवेश निश्चितीसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ ...
---
औरंगाबाद : पालकांनी शाळेत जाऊन आरटीईतून प्रवेश निश्चितीसाठी ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत केवळ ८५० प्रवेश निश्चित झाले असून ११२८ प्रोव्हीजनल प्रवेश झाले. तर उर्वरित सुमारे दीड हजार पालकांनी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामागची कारणे शोधण्याची गरज असून आरटीई प्रवेश प्रक्रियेला गतिमान करून शाळांकडून पालकांची होणारी अडवणूक थांबविण्याची मागणी आरटीई पालक संघाने केली आहे.
जिल्ह्यात ६०३ शाळांत ३६२५ आरटीई जागांसाठी ३४७० विद्यार्थ्यांची सोडतीतून निवड करण्यात आली. त्यासाठी पालकांना ११ ते ३० जूनपर्यंत शाळेत जाऊन प्रवेश निश्चिती करायची होती. त्याला ९ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. आतापर्यंत ११२८ प्रोव्हिजन प्रवेश करण्यात आले. २० दिवसांत केवळ ८५० प्रवेश निश्चित झाले.
जात वैधता प्रमाणपत्राची मागणी यासह शाळा चालकांकडून शासन परिपूर्ती देत नाही म्हणून पालकांची अडवणूक करुन शुल्काची मागणी केली जाते. आर्थिकदृष्ट्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना परत कसे वंचित ठेवता येईल अशाप्रकारे शिक्षणाच्या अधिकार कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे आरटीई प्रवेश करतांना विनाअनुदानित, इंग्रजी शाळांकडून अडवणूक सुरू असल्याचा आरोप आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी केला आहे.