इतिहासाचे पुनर्लेखन हा एकमेव अजेंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 11:54 PM2018-01-18T23:54:17+5:302018-01-18T23:54:30+5:30
भारताच्या इतिहासात ज्यांनी राष्ट्रध्वजातील रंगांवर आक्षेप घेतला. राष्ट्रगीताला विरोध केला, असे लोक आता त्याच्या सक्तीसाठी आग्रही आहेत. चित्रपटगृहात कोणी उभे राहिले नाही, तर त्याला देशद्रोही ठरवत आहेत. या लोकांचा भारताच्या इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने पुनर्लेखन करणे हाच एकमेव अजेंडा असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार व ग्रामीण भागाचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : भारताच्या इतिहासात ज्यांनी राष्ट्रध्वजातील रंगांवर आक्षेप घेतला. राष्ट्रगीताला विरोध केला, असे लोक आता त्याच्या सक्तीसाठी आग्रही आहेत. चित्रपटगृहात कोणी उभे राहिले नाही, तर त्याला देशद्रोही ठरवत आहेत. या लोकांचा भारताच्या इतिहासाचे चुकीच्या पद्धतीने पुनर्लेखन करणे हाच एकमेव अजेंडा असल्याची टीका ज्येष्ठ पत्रकार व ग्रामीण भागाचे अभ्यासक पी. साईनाथ यांनी केली.
स्टुडंट फेडरेशन आॅफ इंडियातर्फे विद्यापीठातील नाट्यगृहात २ ºया राज्यस्तरीय विद्यापीठ विद्यार्थी संमेलनाचे उद्घाटन पी. साईनाथ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी एसएफआयचे राज्य अध्यक्ष मोहन जाधव होते. तर एसएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष व्ही. पी. सानू, राष्ट्रीय सचिव विक्रमसिंग, स्वागताध्यक्ष भगवान भोजणे, राज्य सचिव बालाजी कलेटवाड, मंजूश्री कबाडे, रोहिदास जाधव, अॅड. सुनील राठोड यांची मंचावर उपस्थिती होती. यावेळी पी. साईनाथ यांनी केंद्र सरकारवर परखड टीका केली. रवींद्रनाथ टागोर यांनी आदिवासी भागात जाऊन कृषी महाविद्यालय उभारले. पुढे हे शांतीनिकेतन झाले. त्याला केंद्रीय विद्यापीठाचा दर्जा मिळालेला आहे. सध्याच्या कुलगुरूंनी लालसेपोटी विद्यापीठात चक्क गोशाळा उघडली आहे. यासाठी कारण दिले की, रवींद्रनाथ टागोर हे सुद्धा दुधासाठी गायी पाळायचे. त्याचे गोशाळा हे स्वप्न होते. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी २०० गायींची खरेदी करण्यात येत आहे. यातील ४० मिळाल्या आहेत. कर्मचारी, ठेकेदारांना देण्यासाठी पैसा नाही. तेथे गायी आणल्या जात आहेत. सीएसआरच्या फंडातूनही गोशाळा उभारण्यात येत आहेत, हे धोकादायक आहे. आपले पंतप्रधान कार्यालय रोहित वेमुला हा दलित नव्हता हे सिद्ध करण्यासाठी हस्तक्षेप करते, यावरून देश कोणत्या दिशेने जात आहे हे लक्षात येत असल्याचेही साईनाथ यांनी सांगितले. काँग्रेसच्या कार्यकाळात उद्योगपतींना फायदा पोहोचविण्याचा वेग कमी होता. मात्र, विद्यमान सरकार उद्योगपतींसाठीच कार्य करते. पंतप्रधानांचा फोटो जाहिरातीसाठी वापरण्यात येतो. यातच सर्व काही आले. विक्रमसिंग, भगवान भोजणे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अॅड. सुनील राठोड यांनी केले.