हिरापूर परिसरात नुसत्याच टोलेजंग इमारती; पण ड्रेनेज अन् कचऱ्याची बोंब
By साहेबराव हिवराळे | Published: February 6, 2024 11:24 AM2024-02-06T11:24:15+5:302024-02-06T11:25:01+5:30
एक दिवस एक वसाहत: सिडकोकडे कराच्या माध्यमातून ९ कोटींच्या जवळपास निधी पडून आहे; परंतु सिडकोने या झालर क्षेत्रात कोणताही विकास केलेला नाही.
छत्रपती संभाजीनगर : जालना रोडच्या कडेला चिकलठाणा हद्दीत असलेल्या हिरापूर परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या खऱ्या पण सांडपाण्याची व्यवस्था नसल्याने रिकामे भूखंड डबके बनले आहेत. मोकाट कुत्री, डुकरे अन् सरपटणारे प्राणी दिवसाआड नागरिकांच्या दृष्टीस पडल्याशिवाय राहत नाहीत. झालर क्षेत्रातील विकासाचे वांधे झाले असून, अनेकदा जीव मुठीत धरूनच कामगारांना घर गाठावे लागत आहे.
सिडकोकडे कराच्या माध्यमातून ९ कोटींच्या जवळपास निधी पडून आहे; परंतु सिडकोने या झालर क्षेत्रात कोणताही विकास केलेला नाही. सामान्य नागरिक तसेच कामगार कुटुंबीयांनी या भागात घरे घेतलेली असून, त्यांना मूलभूत सेवासुविधा अद्यापही मिळालेल्या नाहीत. फक्त घराचे निर्माण कार्य काढण्यासाठी सातत्याने सिडकोकडूनच परवानगी घेणे रास्त होते. त्यामुळे नागरिकांनी तसेच व्यावसायिकांनी सिडकोकडे कर अदा करून रीतसर परवानग्या घेतलेल्या आहेत. परंतु सेवासुविधा पुरविण्याच्या नावाने हात वर केले असल्याचे निदर्शनास येत आहे. हिरापूर परिसरातील मूलभूत समस्यांसाठी टाहो फोडावा तो कुणाकडे, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित होत आहे.
घरासमोर सरपटणारे प्राणी...
सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सेफ्टी टँक बनवून त्या पाण्याचा निचरा करण्याची स्थानिक स्वराज्य संस्थेची जबाबदारी आहे. परंतु त्याकडे कुणीही लक्ष देत नाही. पावसाळ्यात ज्या प्रमाणे पावसाचे पाणी तुंबते, त्याच प्रमाणे १२ महिने ड्रेनेजचे सांडपाणी रिकाम्या प्लाॅटवर तुंबलेले असते. त्यात उगवलेली झाडेझुडपे मोठी झाली आहेत. त्यात वराह व सापांच्या प्रजाती आढळून येत आहेत. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागत आहे. ही स्वच्छता करण्याची जबाबदारी सिडकोची की ग्रामपंचायतीची, असा प्रश्न पडतो.
- विष्णू गायकवाड, रहिवासी
रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी....
हिरापूर परिसरातील वसाहतीचे सांडपाणी जयहिंदनगरी परिसरात सातत्याने वाहत असून या पाण्यातून विद्यार्थी व कामगारांना रस्ता ओलांडावा लागत आहे. ग्रामपंचायतीचे कर्मचारी येतात, परंतु काही करीत नाहीत. मनपाच्या पदाधिकाऱ्यांनी तर एकदाही परिसरात भेट दिलेली नाही. ड्रेनेजलाइन टाकून सांडपाण्याचा निचराही बिल्डरने केलेला नाही. उलट सांडपाणी उघड्यावर सोडून एक प्रकारे थट्टा केलेली आहे.
- सुधाकर शेळके, रहिवासी
या जबाबदाऱ्या कोणाच्या?
जयहिंदनगरी मनपा हद्दीत असून हिरापूर येथे नव्याने टोलेजंग उभारलेला हा परिसर आहे. बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी वापरावे लागते. कचरागाडी येत नाही तर तो स्वत:च जाळून टाकावा लागतो. सिडको, मनपा, ग्रामपंचायत यापैकी लक्ष देणार कोण?
-सुनीता नवघरे, रहिवासी
कुमकुवत वीज बोअरवेलही चालत नाही...
परिसरात जागा घेऊन घरे बांधली; परंतु घरातील वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने असतो. त्यामुळे पाणीपुरवठा करणारे बोअरवेलही अत्यंत कमी दाबाने चालतात. अनेकदा वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीकडे महावितरण विभागाचे कर्मचारी दुर्लक्ष करतात. वीज गुल झाल्यावर मोठी पंचाईत होते, एकूणच स्थिती अवघड आहे.
- सुरेश देशमुख, रहिवासी
केरकचऱ्याचे ढिगारे...
प्रत्येक ग्रामपंचायत किंवा मनपाकडे कचरा गोळा करणारी वाहने असतात. कर्मचारी सफाई करण्यासाठी पाठविले जातात, परंतु या परिसराकडे कुणीही फिरकत नाही. पावसाळ्यातच नव्हे तर बारा महिने सांडपाणी वाहते.
-उद्धव देशमुख, रहिवासी
सिडकोने विकास करावा, अन्यथा रक्कम द्यावी...
झालर क्षेत्रात हिरापूर परिसर असल्याने करापोटी सिडकोकडे जमा ९ कोटींच्या जवळपास रक्कम असून त्यातून कोणताही विकास केला गेला नाही. रस्ते, ड्रेनेजचा प्रश्न त्यातून मार्गी लावण्यासाठी ही रक्कम ग्रामपंचायतीला परत द्यावी, अशी मागणी केलेली आहे.
-उपसरपंच विठ्ठल सुंदर्डे