केवळ वर्णनावरून पोलिसांनी काढला माग, सुपरवायझरला लुटणारे चौघे गजाआड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2017 06:26 PM2017-11-22T18:26:45+5:302017-11-22T18:36:12+5:30
कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणा-या एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणा-या चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या.
औरंगाबाद: कामगारांचे वेतन करण्यासाठी जाणा-या एका कंपनीच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला करून २ लाख ९५ हजार रुपये लुटणा-या चौघांना एमआयडीसी वाळूज पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या आरोपींकडून १ लाख ७५ हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी पोलिसांनी हस्तगत केली. या कामगिरीबद्दल आयुक्तांनी पोलिसांच्या पथकाला ३० हजार रुपये बक्षीस दिले.
लुटमारीचा कट रचणारा मुख्य आरोपी विष्णू सानप, सतीश पांडुरंग चव्हाण (१९,रा.जयभवानीनगर, वडगाव कोल्हाटी), महेश भाऊसाहेब वेताळ (रा.बालाजीनगर, रांजणगाव शे.पूं.) आणि एका विधीसंघर्षग्रस्त मुलाचा (अल्पवयीन) आरोपीमध्ये समावेश आहे. यातील विष्णू सानप याला डॉ. अनुपम टाकळकर यांना पिस्तूलचा धाक दाखवून २५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी पकडले होते. या गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर तो जेलमधून बाहेर आला होता.
याविषयी अधिक माहिती देताना पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे म्हणाले की, वाळूज एमआयडीसीमधील अजिंक्य इंटरप्रायजेस या कंपनीच्या लेबर काँट्रक्टरकडे सुपवायझर असलेले दीपक रत्नाकर तौर हे १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास कंपनीतील कामगारांचे वेतन करण्यासाठी रोख २ लाख ९५ हजार रुपये घेऊन दुचाकीने जात होते. यावेळी मराठवाडा अॅटो कंपनीमागील मोकळया जागेवर दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी तौर यांना अडविले आणि अचानक त्यांच्यावर चाकूहल्ला करून त्यांनी त्यांच्या गळ्यातील पैशाची बॅग हिसकावून नेली होती.
या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उपायुक्त विनायक ढाकणे, सहायक आयुक्त ज्ञानोबा मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख, पोहेकाँ वसंत शेळके, कारभारी देवरे, प्रकाश गायकवाड, मनमोहनमुरली कोलमी, बंडू गोरे, सुधीर सोनवणे यांनी तपास सुरू केला.
वर्णनावरून संशयिताचे घर गाठणे अन..
आरोपींच्या वर्णनावरून एका संशयिताचे पोलिसांनी घर गाठले तेव्हा संशयित घरी नव्हता. यावेळी त्याच्या आईने त्याला फोनवरून घरी पोलीस आल्याचे सांगताच त्याने मोबाईल बंद केला. यामुळे पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला. यानंतर त्याच्यासोबत कोण असते त्यांचा शोध घेतला असता अन्य तिन जणही घरातून गायब असल्याचे समोर आले. हिंगोली, वाशिम, परभणी आदी ठिकाणी संशयितांचा शोध घेतला. दरम्यान ते आज रांजणगाव येथे येणार असल्याची माहिती मिळताच सापळा रचून पोलिसांनी तीन जणांना पकडले. त्यांच्याकडून रोख पावणे दोन लाखासह दुचाकी जप्त केली.