मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस राहिले असताना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:02 AM2021-04-03T04:02:16+5:302021-04-03T04:02:16+5:30
करोडी फाट्याजवळ भीषण अपघात : लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे जात होते; चेंदामेंदा झाल्याने खोऱ्याने उचलावे लागले मृतदेह औरंगाबाद ...
करोडी फाट्याजवळ भीषण अपघात : लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी नातेवाईकांकडे जात होते; चेंदामेंदा झाल्याने खोऱ्याने उचलावे लागले मृतदेह
औरंगाबाद : मुलाच्या लग्नाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना त्याच्या लग्नाचे आमंत्रण देण्यासाठी जाणाऱ्या वर मायबापाला शुक्रवारी करोडी फाट्याजवळ सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास भरधाव ट्रकने चिरडल्याने दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीस्वार दांपत्याच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. यामुळे हे प्रेत उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला.
संजय पूनमसिंग छानवाल (५१) आणि मीना संजय छानवाल (४६ , दोघे. रा. परसोडा, ता. वैजापूर) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार मयत दांपत्याचा लहान मुलगा गणेशचा विवाह औरंगाबाद तालुक्यातील शामवाडी येथे ७ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे. मीना यांचे माहेर राजेवाडी (ता. बदनापूर) आहे. तेथे राहणाऱ्या भावाला (नवरदेवाचा मामा) ओवाळून त्या लग्नाचे रीतसर निमंत्रण देण्याकरिता पती संजय यांच्यासोबत मोटारसायकलने (एमएच २० - डीएक्स ३१७९) आज सकाळी घरून निघाल्या होत्या. औरंगाबादमार्गे त्यांना राजेवाडीला जायचे होते. धुळे-सोलापूर महामार्गावर समृद्धी महामार्गाचे काम आणि उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. याच पुलाखालून जात असताना समोरून भरधाव आलेल्या ट्रकने त्यांना जोराची धडक दिली. या घटनेत दुचाकीसह छानवाल पती-पत्नी ट्रकच्या समोरच्या चाकाखाली आले. या ट्रकने त्यांना काही फूट फरपटत नेल्याने त्यांच्या शरीरांचा चेंदामेंदा होऊन दोघेही ठार झाले. संजय आणि मीना यांच्या शरीराच्या रक्तामासाचा सडाच रस्त्यावर पडला होता. कोणता मृतदेह कुणाचा हे ओळखता येत नव्हते.
हा अपघात घडल्यावर ट्रकचालक आणि क्लीनर घटनास्थळावरून पळून गेले. या अपघाताची माहिती स्थानिकांनी दौलताबाद पोलिसांना कळविली. यानंतर पोलीस निरीक्षक राजेश्री आडे आणि अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनस्थळी धाव घेतली.
चौकट..
खोऱ्याने उचलावी लागली प्रेतं
घटनास्थळी दोघांच्या शरीराचा चेंदामेंदा झालेला, त्यांचे अवयव एकमेकांत मिसळले होते. यामुळे कोणते प्रेत कुणाचे हे ओळखता येत नव्हते. ही प्रेतं उचलण्यासाठी पोलिसांना खोऱ्याचा वापर करावा लागला. घटनास्थळावरील दृष्ये अंगाचा थरकाप उडविणारी आणि विचलित करणारी होती. हे पाहून पोलिसांनी तातडीने पंचनामा करीत मीना आणि संजय यांचे प्रेत घाटी रुग्णालयात हलविले.
चौकट...
उद्या परत येऊ असे सांगून गेले अन् ...
संजय आणि मीना छानवाल यांनी घरून निघताना राजेवाडी येथे आज रात्री मुक्काम करू आणि उद्या (शनिवार) दुपारपर्यंत घरी परत येऊ, असे मुलगी राधा आणि नवरदेव गणेश यांना सांगितले होते. मात्र, आजच्या घटनेने ते कधीच घरी परतणार नाहीत. त्यांच्या मृत्यूमुळे छानवाल कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्यांच्या मागे विवाहित मुलगा अनिल, अविवाहित गणेश आणि विवाहित मुलगी राधा असा परिवार आहे. या घटनेमुळे परसोडा गाव सुन्न झाले.
==============
(फोटोसह )