जिल्ह्यात केवळ चारच शेडनेट हाऊसला अनुदान
By Admin | Published: September 7, 2016 12:13 AM2016-09-07T00:13:04+5:302016-09-07T00:38:19+5:30
सुनील कच्छवे , औरंगाबाद राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट हाऊससाठी मिळणाऱ्या अनुदानाचे उद्दिष्ट यंदा घटविण्यात आले आहे. परिणामी औरंगाबाद जिल्ह्यात
सुनील कच्छवे , औरंगाबाद
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट हाऊससाठी मिळणाऱ्या अनुदानाचे उद्दिष्ट यंदा घटविण्यात आले आहे. परिणामी औरंगाबाद जिल्ह्यात यंदा केवळ चार शेडनेटलाच शासकीय अनुदान मिळू शकणार आहे. त्यामुळे शेडनेट उभारू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
शेती व्यवसायाच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय फलोत्पादन अभियान राबविले जाते. या अंतर्गत शेतकऱ्यांना विविध घटकांसाठी अनुदान दिले जाते. या योजनेसाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडून निधीची तरतूद केली जाते. मात्र, यंदा औरंगाबाद जिल्ह्याचे काही घटकांसाठीचे उद्दिष्ट घटविण्यात आले आहे.
राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत शेडनेट हाऊस उभारणीसाठी पन्नास टकचके इतके अनुदान देय आहे. गतवर्षी जिल्ह्यात १६ शेडनेट हाऊसला हे अनुदान देण्यात आले होते. परंतु यंदा औरंगाबाद जिल्ह्याला शेडनेट हाऊससाठी शासनाने ९ लाख रुपयांचेच अनुदान दिले आहे. त्यामुळे जिल्ह्यात १०-१० गुंठे आकाराच्या केवळ चार शेडनेट हाऊसलाच अनुदान मिळू शकणार आहे.
पॉली हाऊससाठी तर यंदा थोड्याही निधीची तरतूद झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात यंदा एकाही पॉली हाऊसला अनुदान मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे.
या योजनेसाठी शेतकऱ्यांकडून १ एप्रिलपासूनच आॅनलाईन अर्ज स्वीकारण्यात आलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी आपला नंबर लागावा यासाठी ३१ मार्चच्या रात्रीच नेट कॅफेवरून आॅनलाईन अर्ज दाखल केले होते. परंतु आता उद्दिष्टच घटल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. कृषी विभागाचे उपसंचालक पी. बी. आव्हाळे यांच्याकडे विचारणा केली असता ते म्हणाले, यंदा जिल्ह्यास केवळ चार शेडनेटला अनुदान देणे शक्य होईल एवढ्याच निधीची तरतूद झालेली आहे. गतवर्षीपेक्षा ही तरतूद कमी आहे. परंतु येत्या काही दिवसांत त्यात वाढ होण्याची शक्यता आहे.