स्वत:ला जबाबदार बनविले तरच सक्षम व्हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:06 AM2021-01-25T04:06:31+5:302021-01-25T04:06:31+5:30
युवती सेनेच्यावतीने व पोलिसांच्या सहकार्याने रविवार २४ जानेवारी रोजी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात ‘सक्षम ती’ या ...
युवती सेनेच्यावतीने व पोलिसांच्या सहकार्याने रविवार २४ जानेवारी रोजी सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या गोविंदभाई श्रॉफ सभागृहात ‘सक्षम ती’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवासेनेच्या सदस्या शीतल देवरूखकर व दामिनी पथकातील पोलीस उपनिरिक्षक स्नेहा करवाडे यांनी युवतींशी संवाद साधला. राजेंद्र जंजाळ, कॉलेज कक्ष सचिव ऋषिकेश जैस्वाल, कार्यक्रमाच्या आयोजक तथा युवती सेनेच्या डॉ. अश्विनी जैस्वाल यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
स्नेहा करवाडे म्हणाल्या की, कुणाशी कितपत मैत्री करायची, थांबायचे कुठे आणि नाही म्हणायचेे कुठे हे तरूणींना वेळीच ध्यानात येणे खूप गरजेचे आहे. जोपर्यंत तुम्ही सहन कराल, तोपर्यंत तुम्हांला त्रास होणारच. त्यामुळे स्वत: खंबीर व्हा, अशा शब्दांत त्यांनी युवतींशी अनेक विषयांवर दिलखुलास संवाद साधला. तर कुणाला नकार द्यायचा असेल तर तो ठाम शब्दांत द्या. तुमचा स्पष्ट नकार तुमच्या आवाजातून आणि डोळ्यातून व्यक्त होऊ द्या, असे शीतल यांनी तरूणींना समजावून सांगितले.
चौकट :
सोशल डिस्टन्सिंगचा बट्ट्याबोळ
सभागृहात कोणताही कार्यक्रम घेताना एक आड एक खुर्ची रिकामी ठेवण्याचा नियम आहे. पण हा नियम धाब्यावर बसवून सोशल डिस्टन्सिंगचा बट्टयाबोळ झालेला या कार्यक्रमात दिसून आला. सभागृह जवळपास ८५ टक्के भरलेले होेते.