समाजमान्यता असलेली माध्यमेच स्पर्धेत टिकतील: राजेंद्र दर्डा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2023 07:07 PM2023-01-10T19:07:15+5:302023-01-10T19:07:56+5:30
खरा मालक वाचक, हे लक्षात ठेवा; लोकमतचा ४१ वा वर्धापन दिन उत्साहात
औरंगाबाद : ‘प्रचंड मेहनत घेत, तंत्रज्ञानाशी स्पर्धा करीत येणाऱ्या आव्हानांवर मात करीत राहूया ’ असे आवाहन सोमवारी लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी केले. केवळ सत्तेचे बळ नव्हे तर समाजमान्यता महत्त्वाची आहे. ज्या माध्यमाला समाजमान्यता असते, तेच स्पर्धेत टिकून राहते, असे ते म्हणाले.
लोकमत, औरंगाबाद आवृत्तीच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त ते लोकमतच्या सभागृहात सकाळी लोकमत परिवाराशी संवाद साधत होते. हा वर्धापन दिन राजेंद्र दर्डा आणि कार्यकारी संचालक (संपादकीय) करण दर्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम लोकमतचे संस्थापक व ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व. जवाहरलाल दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून केक कापण्यात आला.
१९८२ पासूनचा लोकमतचा प्रवास उलगडताना राजेंद्र दर्डा भावुक होत होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लोकमत सुरू झाला; परंतु नवनवे प्रयोग, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि मेहनती कर्मचारीवर्ग या जोरावर लोकमतची यशस्वी घोडदौड चालूच आहे. हे करीत असताना लोकमतचा खरा मालक हा वाचकच असतो, याचे भान सदोदित ठेवायला हवे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला.
‘लोकमत’ हे शीर्षक कसे मिळाले, त्याची कथा राजेंद्र दर्डा यांनी सांगितली. स्व. बाबा दळवी, स्व. शि. ल. देशमुख यांच्या योगदानाचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. वयाच्या ८४ व्या वर्षीही विंग कमांडर टी. आर. जाधव आपल्या सहकाऱ्यांसमवेत लोकमत हेल्पलाइनचे कसे उत्कृष्ट काम करीत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लोकमतमध्ये काम करणाऱ्या बहुतेक कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी ग्रामीण वा सर्वसामान्य कुटुंबाची असल्याचे त्यांनी नमूद केले. काळाबरोबर लोकमतमध्ये कसे नवनवे प्रयोग होत गेले, याची माहिती त्यांनी दिली. कार्यकारी संचालक करण दर्डा यांनी आपले विचार मांडत सर्वांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी, लोकमतचे संपादक नंदकिशोर पाटील यांनी प्रास्ताविक केले. ‘आजचा दिवस हा क्रांती दिवस होय. लंडनहून शिक्षण घेऊन आलेले राजेंद्र दर्डा हे महानगराकडे न जाता तुलनेने मागास असलेल्या मराठवाड्यात येतात आणि वाचकांच्या विश्वासास पात्र ठरणारे लोकमत चालवतात, ही गोष्ट क्रांतिकारीच होय’, असे ते म्हणाले. तनुजा भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. संपादक चक्रधर दळवी यांनी आभार मानले.