तब्बल नऊ लाख फायलींना वाळवी
By Admin | Published: December 20, 2015 11:53 PM2015-12-20T23:53:29+5:302015-12-21T00:01:40+5:30
औरंगाबाद : नगर परिषद आणि महापालिकेचे रेकॉर्ड सांभाळण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र रेकॉर्ड रूम तयार केली आहे. या रेकॉर्ड रूममध्ये मागील पन्नास वर्षांपासून अधिक काळाचे दस्तऐवज आहेत.
औरंगाबाद : नगर परिषद आणि महापालिकेचे रेकॉर्ड सांभाळण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र रेकॉर्ड रूम तयार केली आहे. या रेकॉर्ड रूममध्ये मागील पन्नास वर्षांपासून अधिक काळाचे दस्तऐवज आहेत. या फायलींना हळूहळू वाळवी लागण्यास सुरुवात झाली आहे. आजही मनपाला काही जुने रेकॉर्ड तपासायचे असल्यास रेकॉर्ड रूममध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठाण मांडून बसावे लागते. हे रेकॉर्ड नष्ट होऊ नये यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही उपाययोजना करण्यात येत नाहीत, हे विशेष.
नगर परिषदेच्या काळात हिमायतबाग येथील १० एकर जागा वन विभागाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. ३० वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आलेल्या जागेचा भाडेपट्टा २०११ मध्ये संपला. मात्र, मनपाने संबंधित जागा ताब्यात घेतली नव्हती. २०१५ मध्ये नगरसेवकांनी ओरड केल्यावर मनपाने जुने रेकॉर्ड शोधून जागा ताब्यात घेतली. मनपाच्या दैनंदिन कामकाजात आजही अनेक महत्त्वाच्या फायलींची चाळणी करावी लागते. सर्वसामान्य नागरिकांनाही जुने रेकॉर्ड येथेच मिळते.
दररोज पन्नासपेक्षा अधिक नागरिकांना जन्म-मृत्यूचे रेकॉर्ड मिळविण्यासाठी यावे लागते. रेकॉर्ड रूममधील अनेक महत्त्वाच्या फाईल मागील काही वर्षांमध्ये गायब झाल्याचेही बोलल्या जाते. आजही ९ लाखांहून अधिक फायली उपलब्ध आहेत. एवढे मोठे रेकॉर्ड सांभाळण्यासाठी मनपाने स्वतंत्र कर्मचारी नेमले आहेत. दर महिन्याला रेकॉर्डवर औषध फवारणी करावी लागते. औषध फवारणी न केल्यास वाळवी संपूर्ण कागदांची चाळणी करते. औषध फवारणीमुळे कर्मचाऱ्यांना या रेकॉर्ड रूममध्ये बसणे असाह्य होते.