Video: 'यंदा फक्त दीड क्विंटल कापूस झाला'; केंद्रीय पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2023 02:44 PM2023-12-13T14:44:33+5:302023-12-13T14:45:36+5:30
केंद्रीय पथकाचा छत्रपती संभाजीनगर तालुक्यात दुष्काळ पाहणी दौरा; चार गावांना दिली भेट
- रऊफ शेख
फुलंब्री : केंद्रीय कृषी मंत्रालयातील दोन सदस्यीय पथक बुधवारी सकाळी दहा वाजता छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चार गावातील दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले. रस्त्यावरील चार गावांतील पिकांची पाहणी करून ५० मिनिटांत दौरा आटोपून पथक सोयगाव तालुक्यातील पहाणीसाठी रवाना झाले.
राज्य सरकारने यंदा छत्रपती संभाजीनगर तालुका दुष्काळी म्हणून जाहीर केला आहे. या तालुक्यात दुष्काळाची काय स्थिती आहे याची पाहणी केंद्रीय कृषी मंत्रालयातील ए.एल. वाघमारे, हरीश उंबरजे या दोन अधिकाऱ्यांचे पथक करत आहे. पथकाने सकाळी १० वाजता छत्रपती संभाजीनगर -ते जळगाव महामार्गावर तुळजापूर येथील कपाशी पिकाची पाहणी केली त्य नंतर मोरहीरा ,खामखेडा ,डोनवाडा या गावातील रस्त्यालागत असलेल्या शेतातील कपाशी, मका,मुरघास या पिकांसह शेततळे ,पाझर तलावची पाहणी केली. यावेळी पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद देखील साधला.
छत्रपती संभाजीनगर तालुक्यात केंद्रीय कृषी विभागाच्या पथकाने केली दुष्काळ परिस्थितीची पाहणी #chhatrasambhajinagar#agriculturepic.twitter.com/l51rnHWi9E
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) December 13, 2023
यावेळी मागील वर्षी कपाशी लागवड केली होती त्यातून ९ क्विंटल कापसाचे उत्पादन निघाले होते, त्याच शेतात यंदा केवळ दीड क्विंटल कापूस निघल्याची व्यथा शेतकरी रामा कुटे यांनी पथकासमोर मांडली. या पथकासोबत अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे,उपविभागीय अधिकारी रामेश्वर रोडगे, तहसीलदार रमेश मुनलोड, तालुका कृषी अधिकारी गुळवे, गटविकास अधिकारी मीना रावताळे, पोलीस निरीक्षक रवींद्र निकाळजे, पंचायत समिती विस्तार अधिकारी जायभाये आदींची उपस्थिती होती.