विस्तीर्ण छत असलेली औरंगाबादची जामा मशीद देशात एकमेव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 06:57 PM2018-07-02T18:57:22+5:302018-07-02T19:04:44+5:30

शहराच्या ऐतिहासिक वास्तूमधील एक असलेल्या आमखास मैदानाजवळील जामा मशीद ही देशातील सर्वात विस्तीर्ण छत असलेली एकमेव मशीद असल्याची माहिती जामिया इस्लामिया काशीफ - उल -उलूमचे प्रमुख मौलाना मोईजोद्दीन फारु की नदवी यांनी दिली.

The only one in the country, the Jama Moshid of Aurangabad with a wide roof top | विस्तीर्ण छत असलेली औरंगाबादची जामा मशीद देशात एकमेव

विस्तीर्ण छत असलेली औरंगाबादची जामा मशीद देशात एकमेव

googlenewsNext

औरंगाबाद : शहराच्या ऐतिहासिक वास्तूमधील एक असलेल्या आमखास मैदानाजवळील जामा मशीद ही देशातील सर्वात विस्तीर्ण छत असलेली एकमेव मशीद असल्याची माहिती जामिया इस्लामिया काशीफ - उल -उलूमचे प्रमुख मौलाना मोईजोद्दीन फारु की नदवी यांनी दिली.

औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीतर्फे आमखास मैदान परिसरातील ऐतिहासिक वास्तूची माहिती घेण्यासाठी हेरिटेज वॉकचे आयोजन केले होते. या वॉकची सुरुवात आमखास मैदानावरून झाली. याठिकाणी संयोजक डॉ. बिना सेंगर यांनी आमखास मैदानाची वैशिष्ट्ये सांगत मलिक अंबरच्या कार्यकाळात या जागेला महत्त्व प्राप्त झाल्याचे सांगितले. यानंतर इतिहासप्रेमींनी देशातील सर्वांत मोठे छत असलेल्या ऐतिहासिक जामा मशिदीची माहिती घेतली. त्याठिकाणी मशिदीचे इमाम हफीज जाकेर साहब, मौलाना मुजीब साहब आणि मुफ्ती नईम साहब यांनी जामा मशिदीचा इतिहास सांगितला.

जामा मशिदीची निर्मिती मलिक अंबर यांनी १६१२ मध्ये केली. सुरुवातीला ही मशीद १५ खांबांची होती. पुढे १६५० मध्ये औरंगजेब बादशाह याने मशिदीचा विस्तार केला. ५५ खांबांवर सर्वात मोठे छत टाकण्यात आले. अशा पद्धतीचे मोठे छत असलेली ही देशातील एकमेव मशीद आहे.  याशिवाय परिसरात मदर साई चालविण्यात येतो. यात पूर्वी मदरसा, वसतिगृह होते. निजामाच्या काळात या वसतिगृहाच्या माध्यमातून सर्वधर्म समभावाचे दर्शन घडत असे.

पुढे भारताच्या स्वातंत्र्यानंतर १९५९ साली काशीफ-उल- उलूम या मदरशाची स्थापना मौलाना सईद यांनी केली. तेव्हापासून आजपर्यंत या मदरशातून लाखो विद्यार्थ्यांनी धार्मिक-सामाजिक  शिक्षण घेतले आहे. यातील अनेकजण डॉक्टर, अभियंते, प्रशासकीय अधिकारी बनले असल्याचेही इमाम यांनी स्पष्ट केले. सध्या या मदरशात दोन हजार विद्यार्थी शिक्षण घेत असल्याचे त्यांनी सांगितले. या हेरिटेज वॉकमध्ये आॅस्ट्रेलियातील प्रोफेसर अलर्ब्ट गोमसे, गोवा येथील जॉन क्रुझ, संयोजिका डॉ. बिना सेंगर, लतीफ शेख, स्वप्नील जोशी, डॉ. कामाजी डक, नीता गंगावणे, पंकज लभाने, नीलिमा मार्कंडेय आदी इतिहासप्रेमींनी सहभाग नोंदवला.

शुक्रवारी अलोट गर्दी
जामा मशीद येथे दर शुक्रवारी विशेष नमाजसाठी भाविक अलोट गर्दी करतात. शहरातील सर्वांत मोठ्या मशिदीमध्ये नमाज अदा करण्यासाठी शहराच्या वेगवेगळ्या भागात राहणारे भाविक दुपारी वेळेपूर्वी येथे दाखल होतात.

Web Title: The only one in the country, the Jama Moshid of Aurangabad with a wide roof top

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.