सेनेसह राकाँकडून एकालाच ‘एबी’ फॉर्म
By Admin | Published: February 3, 2017 12:42 AM2017-02-03T00:42:50+5:302017-02-03T00:50:25+5:30
उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी १२ गट आणि २४ गणातून सुमारे ३७० उमेदवारी अर्ज दाखल झाले.
उस्मानाबाद : उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच बुधवारी १२ गट आणि २४ गणातून सुमारे ३७० उमेदवारी अर्ज दाखल झाले. या अर्जांची गुरूवारी छाननी करण्यात आली आली. छाननीदरम्यान वडगाव सिद्धेश्वर गटातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शंकर बोरकर यांनी शिवसेनेचेच अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्या यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. सुनावणीअंती तो फेटाळला. चिखली गणातून एकाच उमेदवारास शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही उमेदवारी (एबी फॉर्म) दिली आहे. तर बेंबळी गटातील सेनेच्या उमेदवार मिरा खापरे यांच्या अर्जामध्येही त्रुटी निघाली.
उस्मानाबाद तालुक्यात जिल्हा परिषदेचे बारा गट आहेत. या गटातून १२६ उमेदवारांनी मिळून १५१ नामनिर्देशनपत्र दाखल केले होते. तर पंचायत समितीचे २४ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघातून १९३ उमेदवारांनी मिळून २१९ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सदरील अर्जांची छाननी प्रक्रिया तहसील कार्यालय परिसरात असलेल्या सभागृहामध्ये पार पडली. सदरील प्रक्रियेदरम्यान वडगाव सिद्धेश्वर गटातून शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शंकर बोरकर यांनी शिवसेनेचेच अधिकृत उमेदवार गुलाबराव जाधव यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला. जाधव हे एका मजूर सहकारी संस्थेचे सदस्य आहेत. या संस्थेचे रजिस्ट्रेशन सन २०२१ पर्यंत असून त्यांनी आजवर सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे जाधव यांचा अर्ज अवैैध ठरविण्यात यावा, असा आक्षेप नोंदविला. सुनावणीदरम्यान सदरील आक्षेपाच्या अनुषंगाने युक्तीवाद झाला असता, बोरकर यांचा आक्षेप फेटाळल्याने जाधव यांचा अर्ज वैैध ठरला. दरम्यान, एकीकडे उमेदवारी मिळावी म्हणून इच्छुक पक्षश्रेष्ठींचे उंबरठे झिजवित आहेत. असे असतानाच दुसरीकडे एकाच उमेदवाराला चक्क दोन पक्षांनी ‘एबी’ फॉर्म दिल्याचे छाननीतून समोर आले. उस्मानाबाद तालुक्यातील चिखली गणातून कुसूम अर्जुन इंगळे यांना शिवसेनेकडूनही ‘एबी’ फॉर्म देण्यात आला आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनही त्यांनाच ‘एबी’ फॉर्म दिला गेला. राष्ट्रवादीकडून देण्यात आलेल्या फॉर्मवर दुसऱ्या क्रमांकावर मेडसिंगा येथील कांबळे यांचे नाव आहे. त्यामुळे आता कुसूम इंगळे या शिवसेनेची उमेदवारी घेतात की राष्ट्रवादीची हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इंगळे यांनी सेनेची उमेदवारी घेतल्यास आपसूकच राष्ट्रवादीची उमेदवारी कांबळे यांच्याकडे जाईल.
दरम्यान, बेंबळी गटातून शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केलेल्या मिरा खापरे यांच्या उमेदवारी अर्जामध्येही निवडणूक विभागाने त्रुटी काढली. पक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या ‘एबी’ फॉर्मवर गटाऐवजी गणाचा क्रमांक नमूद करण्यात आलेला होता. तर गणातील सेनेचे उमेदवार कमलाकर दाणे यांच्या अर्जावर गणाऐवजी गटाचा क्रमांक होता. याच त्रुटीच्या अनुषंगाने उपरोक्त उमेदवाराचा अर्ज नेमका कोणत्या जागेसाठी आहे? याचा खुलासा करावा, अशा आशयाचे पत्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी संबंधित पक्षाला दिले असता पक्षाने निवडणूक विभागाकडे खुलासा सादर केला. त्यामुळे खापरे यांच्यासह दाणे यांचाही उमेदवारी अर्ज वैैध ठरला. छाननीत गटासाठीचा एक तर गणासाठीचे पच अर्ज अवैैध ठरले.