लोकप्रतिनिधींनीच केले कोरोना नियमांचे उल्लंघन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:05 AM2021-03-19T04:05:42+5:302021-03-19T04:05:42+5:30
हतनूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या गर्दी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. तर दुसरीकडे चार दिवसांवर आलेल्या जिल्हा मध्यवर्ती ...
हतनूर : कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे सध्या गर्दी करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध घातले आहेत. तर दुसरीकडे चार दिवसांवर आलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी सर्रास बैठका, मेळावे घेतले जात असल्याचा धक्कादायक प्रकार हतनूरमध्ये घडला आहे. विशेष म्हणजे, या बैठकांना दोन मंत्री, दोन आमदारांची उपस्थिती असल्याने लोकप्रतिनिधींकडूनच जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांना केराची टोपली दाखविली आहे.
औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी २१ मार्च रोजी मतदान होणार आहे. बँकेेचे विद्यमान संचालक नितीन पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांच्याच महाविद्यालयात बुधवारी दोन मंत्री, दोन आमदारांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. या बैठकीला जिल्हा बँकेचे सर्व उमेदवार, मतदार, कॅबिनेटमंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आ. अंबादास दानवे, माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांची उपस्थिती होती.
त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य शासनासह जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाणे टाळावे, मास्कचा वापर करावा आदी नियम लावण्यात आले आहेत. तर सर्वसामान्य नागरिकांना वेठीस धरले जात आहे. काही ठिकाणी आठवडी बाजार बंद तर कुठे हॉटेल बंद करायला सांगितले जात आहेत. एकीकडे राज्य शासन लोकांना ब्रम्हज्ञान शिकवित आहेत. तर दुसरीकडे त्याचेच मंत्री, आमदार स्वत: मात्र नियमांचे उल्लंघन करीत आहेत. निवडणुकीचे निमित्त करून एकत्रित येत कोरोनाचा संसर्गाचा धोका वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. सार्वजनिक मेळावे घेऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोण शिक्षा करणार, हा सर्वसामान्य नागरिकांना पडलेला प्रश्न आहे.