‘पीएसबीए’ शाळेत ‘आरटीई’ कोट्यातून फक्त ‘टीचिंग’ मोफत; इतर उपक्रमांसाठी वेगळा ‘चार्ज’

By राम शिनगारे | Published: August 4, 2023 12:57 PM2023-08-04T12:57:22+5:302023-08-04T12:58:07+5:30

‘पीएसबीए’ शाळेत विद्यार्थ्यांशी भेदभावाचा धक्कादायक प्रकार : शिक्षण विभागाकडून चौकशीचे आदेश

Only 'teaching' free from 'RTE' quota in 'PSBA' school; Separate 'charge' for other activities | ‘पीएसबीए’ शाळेत ‘आरटीई’ कोट्यातून फक्त ‘टीचिंग’ मोफत; इतर उपक्रमांसाठी वेगळा ‘चार्ज’

‘पीएसबीए’ शाळेत ‘आरटीई’ कोट्यातून फक्त ‘टीचिंग’ मोफत; इतर उपक्रमांसाठी वेगळा ‘चार्ज’

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : पद्मश्री शंकर बापू आपेगावकर (पीएसबीए) इंग्लिश स्कूलमधील शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना पैशासाठी भेदभावाची वागणूक देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या विद्यार्थ्यांना शालेय उपक्रमापासून वंचित ठेवले जात आहे. हा गंभीर प्रकार शालेय शिक्षणमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर त्यांनी शाळेच्या चौकशीचे आदेश दिले.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील हिरापूर शिवारात पीएसबीए इंग्लिश स्कूल आहे. या शाळेत शिक्षण हक्क कायद्यानुसार गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात. या कोट्यातून प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांना ‘हॉबीज’च्या नावाखाली दहा हजार रुपये शुल्क मागितले जाते. ज्या विद्यार्थ्यांचे पालक दहा हजार रुपये भरणार नाहीत, त्या विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांत सहभागी करून घेतले जात नाही. ही आपबितीच चिमुकल्यांनी कथन केली. दैनंदिन उपक्रमांशिवाय १५ ऑगस्ट, २६ जानेवारीसारख्या राष्ट्रीय कार्यक्रमांतही समाविष्ट करून घेतले जात नाही. या वागणुकीचा विद्यार्थ्यांच्या मनावर विपरीत परिणाम होऊ लागल्यामुळे पालकांनी शाळेची तक्रार शिक्षण विभागाकडे केली; मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे पालकांनी नुकतेच दाैऱ्यावर आलेले शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची भेट घेतली. तेव्हा मंत्र्यांनी शाळेच्या चौकशीचे आदेश दिले.

खासगी प्रकाशनाची पुस्तके बंधनकारक
शाळेत एनसीईआरटीची पाठ्यपुस्तके न वापरता खासगी प्रकाशनाची महागडी पुस्तके वापरण्याची सक्तीही असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. एनसीईआरटीची पुस्तके ४०० ते ५०० रुपयांत येतात. मात्र खासगी प्रकाशनांची हीच पुस्तके ४ ते ७ हजार रुपयांपर्यंत जातात.

विस्तार अधिकारी करणार चौकशी
पालकांनी केलेल्या गंभीर आरोपांची चौकशी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने विस्तार अधिकारी जयाजी भोसले यांना आदेश दिल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी दीपाली थावरे-फपाळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुख्याध्यापक, संचालकांचे ‘नो कमेंट्स’
शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा जावळेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोनवर बोलण्यास नकार देत शाळेत येऊन माहिती घ्या, असा सल्ला दिला. शाळेचे संचालक अनिल भोसेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘नो कमेंट्स’ असे उत्तर देत ‘तुम्हाला जे वाटते ते छापा’ असे सांगितले.

Web Title: Only 'teaching' free from 'RTE' quota in 'PSBA' school; Separate 'charge' for other activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.