केवळ चौथी पास व्यवस्थापकाने पतसंस्थेत केला ७९ लाखांचा घोटाळा

By सुमित डोळे | Published: June 30, 2023 07:53 PM2023-06-30T19:53:05+5:302023-06-30T19:53:19+5:30

पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक व अन्य दोघांनी मिळून एक कोटी १४ लाख ३३ हजार ४२५ रुपयांचा घोटाळा केल्याचे उघड

Only the fourth pass manager committed a scam of 79 lakhs in the credit institution | केवळ चौथी पास व्यवस्थापकाने पतसंस्थेत केला ७९ लाखांचा घोटाळा

केवळ चौथी पास व्यवस्थापकाने पतसंस्थेत केला ७९ लाखांचा घोटाळा

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : बावीस वर्षांच्या जय गंगामाई नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये व्यवस्थापक व अन्य दोघांनी मिळून एक कोटी १४ लाख ३३ हजार ४२५ रुपयांचा घोटाळा केला होता. यात व्यवस्थापक गणपत नामदेव गायकवाड याला आर्थिक गुन्हे शाखेकडून बुधवारी अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, केवळ चौथी पास असलेल्या गणपतने यात एकट्याने ७९ लाख़ १० हजार रुपये लंपास केले. लिपिकापासून थेट व्यवस्थापकापर्यंत मिळालेल्या बढतीसह गणपतचा घोटाळ्याचा आत्मविश्वासही वाढला गेला. न्यायालयाने त्याला २ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सहकार आयुक्त तथा निबंधक सहकारी विभागाचे लेखापरीक्षक आबासाहेब नानासाहेब देशमुख यांच्या अहवालावरून मार्च महिन्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जून, २०२१ मध्ये जिल्हा उपनिबंधकांच्या आदेशावरून झालेल्या ऑडिटचा ऑक्टोबर २०२२ मध्ये अहवाल सादर करण्यात आला होता. त्यात तिन्ही आरोपींनी खाेटे हिशेब लिहिणे, खोट्या पुराव्यांच्या आधारे बँकेकडून रक्कम उचलून संस्थेत जमा न करता परस्पर लंपास केली. शिवाय खातेधारकांच्या नावाने लाखो रुपयांचे कर्ज उचलले. संचालक मंडळदेखील यापासून अनभिज्ञ राहिले. पोलिस आयुक्त मनाेज लोहिया, सहायक आयुक्त धनंजय पाटील, निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल यांनी याचा सखोल तपास केला.

यातील इतर आरोपी मारोती मिरगे याने १० लाख ६०, तर गजानन ठाले याने १५ लाख ३३ हजारांचा घोटाळा केला. गायकवाडने ७९ लाख १० हजार ७७५ रुपयांचा घोटाळा केला. चौथी पास असताना संचालक मंडळाने २०१२ मध्ये त्याला लिपिक, तर २०१७ मध्ये व्यवस्थापक बनवले. त्या कार्यकाळात गायकवाडने लाखो रुपये कमावले. परंतु घोटाळा उघडकीस आल्यावर त्याने घर व प्लॉटदेखील गहाण ठेवला; पण त्याचा उपयोग झाला नाही, तेव्हापासून आर्थिक गुन्हे शाखा त्याच्या शोधात होती. जारवाल यांच्यासह प्रभाकर राऊत, प्रकाश डोंगरे, संजय जारवाल यांचे पथक या प्रकरणी तपास करत आहे; तर अन्य दोघांना न्यायालयाने अटकेपासून तात्पुरते संरक्षण दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Web Title: Only the fourth pass manager committed a scam of 79 lakhs in the credit institution

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.