केवळ तीन हजार शौचालयांची कामे पूर्ण
By Admin | Published: February 3, 2017 12:55 AM2017-02-03T00:55:55+5:302017-02-03T00:57:51+5:30
जालना : दहा हजार लाभार्थींना अनुदान वाटप करण्यात आले. प्रत्यक्षात अद्याप ३ हजार शौचालयांचीच कामे पूर्ण झाली आहेत.
जालना : स्वच्छ महाराष्ट अभियानांतर्गत शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी नगर पालिकेकडून सुमारे दहा हजार लाभार्थींना अनुदान वाटप करण्यात आले. प्रत्यक्षात अद्याप ३ हजार शौचालयांचीच कामे पूर्ण झाली आहेत.
हागणदारीमुक्तीसाठी ज्या कुटुंबाकडे शौचालय नाही त्यांना शासन सुमारे १६ हजार रूपयांचे अनुदान देत आहे. त्यानुसार जालना नगर पालिकेने शहरातील १० हजार ७०० लाभार्थींना दहा तसेच सहा हजार रूपयांचे अनुदान वितरित केले आहे. शहरात १३ हजार शौचालयांचे उद्दिष्ट आहे. अनुदान वाटपाची स्थिती पाहता शहरात सुमारे पाच हजारपेक्षा जास्त शौचालयांची कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काही कुटुंबाकडून संथगतीने कामे सुरू असल्याने गती मंदावली आहे.
३१ मार्च अखेर शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जात आहे.
३१ मार्चपर्यंत १३ हजार शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे उद्दिष्ट पालिका प्रशासनासमोर आहे. विशेष म्हणजे काही लाभार्थींनी पूर्ण अनुदान प्राप्त झाले असले तरी त्यांनी शौचालयांची कामे पूर्ण केली नाहीत. जुने शौचालय अथवा इतर ठिकाणचे शौचालय दाखविल्याचे चित्र आहे. शौचायल बांधकामासाठी नगर पालिकेकडून मार्गदर्शन करण्यात येत आहे.
पालिकेतील काही कर्मचारी तसेच लाभार्थींच्या संगनमतामुळे शौचालयांची कामे रखडल्याचे सांगण्यात येते. ज्या लाभार्थींनी अनुदान घेतले आहे त्यांनी शौचालयाचे कामे पूर्ण करावीत अन्यथा पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी दिला.