लग्न सराईत मेमध्ये दोनच मुहूर्त; मंगल कार्यालय बुक केले का?
By प्रशांत तेलवाडकर | Published: March 16, 2024 01:04 PM2024-03-16T13:04:45+5:302024-03-16T13:04:55+5:30
ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान मुहूर्त नसल्याने थेट नोव्हेंबर महिन्यात लग्नतिथी आहे.
छत्रपती संभाजीनगर : नववधू-वर लग्नासाठी बाशिंग बांधून बसले आहेत; पण, सुटीचा काळ असलेल्या मे व जून महिन्यात मुहूर्त कमी आहेत. जुलै महिन्यात मंगल कार्यालय मिळणे कठीण असून, ऑगस्ट ते ऑक्टोबरदरम्यान मुहूर्त नसल्याने थेट नोव्हेंबर महिन्यात लग्नतिथी आहे. तोपर्यंत लग्नाची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
कोणत्या महिन्यात किती मुहूर्त?
महिना लग्नतिथी
मार्च : २६, २७, ३०
एप्रिल : १, ३, ४, ५, १८, २०, २१, २२, २६, २८
मे : २, १२
जून : २, २९, ३०
जुलै : ६, ९, ११, १२, १३, १४, १५
नोव्हेंबर : १७, २२, २३, २५, २६, २७
डिसेंबर : ३, ४, ५, ६, ७, ११, १२, १४, १५, २०, २२, २३, २४, २६
मे, जून महिन्यात मुहूर्त कमी
दरवर्षी मे व जून महिन्यात १५ पेक्षा अधिक लग्नतिथी असतात. मात्र, यंदा मे महिन्यात २ लग्नतिथी तर जून महिन्यात ३ लग्नतिथी आहेत. गुरू आणि शुक्र अस्त असल्याने या काळात विवाह, उपनयन संस्कार, वास्तुशांती, नवचंडी यासारखे कोणतेही विधी केले जात नाहीत.
चतुर्मास काळात लग्न करत नाहीत
चतुर्मास काळात लग्न करत नाहीत, यामुळे ऑगस्ट ते ऑक्टोबर या तीन महिन्यांत एकही लग्नतिथी नाही. मात्र, अटीतटीच्या प्रसंगासाठी पंचांगकर्त्यांनी गौण काळातील लग्नतिथी दिल्या आहेत. जूनमध्ये ७ लग्नतिथी, जुलै ८, ऑगस्ट ८, सप्टेंबर ४ तर ऑक्टोबर महिन्यात ८ लग्नतिथी दिल्या आहेत.
- प्रवीण कुलकर्णी, गुरुजी
जुलैपर्यंत मंगल कार्यालय फुल्ल
सध्या नोव्हेंबर महिन्यातील लग्नतिथी असलेले वधूपिता मंगल कार्यालय बुकिंगसाठी येत आहेत. मार्च, एप्रिल महिन्यातील तिथींना मंगल कार्यालये १०० टक्के बुक आहेत. मे महिन्यात २ तिथी असल्याने त्याही बुक आहेत. ज्यांच्याकडे हॉल आहेत अशांचे मंगल कार्यालय जून व जुलै महिन्यात ८० टक्के बुक आहेत.
- मंगल कार्यालय मालक