दिवसरात्र रस्त्यावरच भरतात ‘ओपन बार’; वाईन शॉपच्या परिसरात नागरिकांना तळीरामांचा त्रास
By राम शिनगारे | Published: December 11, 2024 07:58 PM2024-12-11T19:58:24+5:302024-12-11T19:58:47+5:30
सायंकाळी उघडणाऱ्या वडापाव, चायनीज सेंटर्सवरही अनेकांना सहजपणे दारू मिळते. तेथेच तळीराम दारू ढोसत असल्याचे दिसून आले.
छत्रपती संभाजीनगर : वाईन शॉप, देशी दारूच्या दुकानांच्या बाहेर सकाळपासून संध्याकाळी दुकान बंद होईपर्यंत तळीरामांचे दारू पिण्यासाठी ‘ओपन बार’ रोज भरत आहेत. या प्रकाराचा त्रास येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांना होत असतो. त्याशिवाय उस्मानपुऱ्यासह दारूची काही दुकाने शाळांच्या परिसरात आहेत. त्यामुळे त्याचा त्रासही विद्यार्थ्यांना होत आहे. उस्मानपुरा परिसरातील क्लासेस असलेल्या ठिकाणीच तळीराम सकाळपासून रस्त्यावर दारू पित बसलेले असतात. तो एक रस्ता तळीरामांनी ताब्यात घेतल्याचे दिसले. त्याशिवाय सायंकाळी उघडणाऱ्या वडापाव, चायनीज सेंटर्सवरही अनेकांना सहजपणे दारू मिळते. तेथेच तळीराम दारू ढोसत असल्याचे दिसून आले.
साहेब या भागावर आपले लक्ष आहे का ?
मोंढा नाका उड्डाणपुलाच्या खाली : मोंढा नाका उड्डाणपुलाच्या परिसरातच एक वाईन शॉप आहे. त्याठिकाणी दारू विकत घेऊन तळीराम थेट समोरील उड्डाणपुलाच्या खाली बसूनच दारू पितात. सकाळी ७ वाजेपासूनच गर्दी दिसते. रात्रीपर्यंत तळीरामांचा वावर सुरू असतो.
उस्मानपुऱ्यातील क्लासेसच्या बाजूला : उस्मानपुऱ्यातील देशपांडे चौकाच्या परिसरातच एक वाईन शॉप आहे. त्याच्या अगदी जवळूनच एक रस्ता जातो. त्या रस्त्याच्या बाजूच्या इमारतीमध्ये अनेक क्लासेस आहेत. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थिनींची ये-जा सुरू असते; मात्र त्या वर्दळीच्या रस्त्यावरच तळीराम दारू ढोसतात.
पुंडलिकनगरचा मुख्य रस्ता : पुंडलिकनगरच्या मुख्य रस्त्यावरील अनेक हातगाड्या लागतात. त्यातील काही गाड्यांवर दारू विकतात. तळीरामांना कोणत्या हातगाडीवर काय मिळते, याची माहिती असते. त्या ठिकाणी रस्त्यावरच दारू पितात. हा प्रकार शक्यतो सायंकाळी घडतो. त्याशिवाय सिडको उड्डाणपुलाच्या बाजूच्या सर्व्हिस रोड, रामगिरी हॉटेलच्या इमारतीच्या खालील भागातही सायंकाळी तळीराम उघड्यावरच दारू पिताना दिसले.
रस्त्यावर दारू ढोसताय; कारवाया किती ?
शहर पोलिस काहीवेळा अवैध दारू विक्रेत्यांच्या विरोधात कारवाई करतात; मात्र रस्त्यावरच दारू पिणाऱ्यांवर कोणतीही कारवाई होत नाही. हे तळीराम बिनदिक्कतपणे दारू ढोसतात. त्यांच्यावर कोणाचेही बंधन नसल्याचेच दिसून येते. त्यामुळे रस्त्यावर दारू ढोसणाऱ्या तळीरामांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
‘ओपन बार’वर कारवाई का होत नाही ?
रस्त्यावरच चालविण्यात येणाऱ्या ओपन बारवर कारवाई पोलिसांसह उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत नाही. अवैध दारू विक्रेत्यांवर किरकोळ कारवाया होतात. त्यामुळे वाईन शॉपच्या परिसरातील रस्त्यावर तळीरामांचा संचार अधिक वाढत असल्याचे दिसते.