बायो मेडिकल वेस्टची घंटागाडीतून उघड्यावर विल्हेवाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:02 AM2021-09-25T04:02:12+5:302021-09-25T04:02:12+5:30
वाळूज महानगर : वैद्यकीय घन कचऱ्याची (बायो मेडिकल वेस्ट) उघड्यावर विल्हेवाट लावणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी येथील निरामय रुग्णालयाविरुद्ध प्रदूषण नियंत्रण ...
वाळूज महानगर : वैद्यकीय घन कचऱ्याची (बायो मेडिकल वेस्ट) उघड्यावर विल्हेवाट लावणाऱ्या रांजणगाव शेणपुंजी येथील निरामय रुग्णालयाविरुद्ध प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाईचा बडगा उगारला आहे. या प्रकरणी प्रादेशिक अधिकारी यांच्या तक्रारीवरून गुरुवारी (दि. २३) एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
निरामय हॉस्पिटलचा वैद्यकीय घन कचरा घंडागाडीत भरून त्याची उघड्यावर विल्हेवाट लावली जात असल्याची तक्रार घाणेगावच्या शालूबाई भोकरे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलीस आयुक्ताकडे निवेदनाद्वारे केली होती. या हॉस्पिटलचा वैद्यकीय घनकचरा घंडागाडीत भरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी डॉ. प्रवीण जोशी यांनी क्षेत्र अधिकारी आर. जी. औटी व दीपक बनसोड यांना १९ सप्टेंबरला रांजणगावात पाठविले होते. मंडळाच्या पथकाने हॉस्पिटलला भेट देऊन केलेल्या पाहणीत हॉस्पिटल व्यवस्थापनाकडून वैद्यकीय घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात कुठलेही अभिलेखे जतन करून ठेवले नसल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय घन कचरा साठवून त्याची विल्हेवाट कशा पद्धतीने लावावी, यासंर्दभात प्रशिक्षण दिलेले नसल्याचे समोर आले. या हॉस्पिटलमधील वैद्यकीय घन कचरा ग्रामपंचायतीच्या घंडागाडीत भरून त्याची उघड्यावर विल्हेवाट लावली जात असल्याचा अहवाल क्षेत्र अधिकारी औटी आणि बनसोड यांनी वरिष्ठांकडे सादर केला होता.
चौकट...
तक्रारीनंतर गुन्हा
नियम व अटीचे पालन न करता घंडागाडी (क्रमांक एम.एच.२०, सी.यू.०२४८) मधून घातक वैद्यकीय घन कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळाने प्रादेशिक अधिकारी प्रवीण जोशी यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून हॉस्पिटलविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रांजेंद्र बांगर करीत आहे.
फोटो ओळ- निरामय हॉस्पिटलमधील घंटागाडीत टाकलेला घातक वैद्यकीय घनकचरा.