दार उघड बये आता दार उघड; मंदिर खुले करण्याच्या मागणीसाठी भाजपचे शंखनाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2021 02:16 PM2021-08-30T14:16:50+5:302021-08-30T14:19:32+5:30
आंदोलकांनी मंंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पोलीसांनी तो हाणून पाडला.
औरंगाबाद: भाजपाने मंदिर सर्वांसाठी खुले करण्यासाठी गजानन महाराज मंदिरासमोर शंखनाद करून दार उघड बये आता दार उघड जयघोष करीत संबळ वाजविला. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सणासुदीच्या काळात गर्दी करू नका, असे केंद्र व राज्य शासन सांगत असतांना मंदिर खुले करण्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत भक्तीचे राजकारण रंगल्याचे यातून पाहायला मिळते आहे.
भाजपा शहरजिल्हा अध्यक्ष संजय केनेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी मंदिरे खुले करण्याच्या मागणीसाठी संत श्री गजानन महाराज मंदिरासमोर शंखनाद आंदोलन करण्यात आले. सरकारने जनतेच्या भावनेशी खेळ न करता धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडण्यात यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंदिरावर अवलंबून असलेल्यांची उपासमार करणाऱ्या ठाकरे सरकारचा निषेध अशा घोषणा आंदोलनात देण्यात आल्या.
आंदोलकांनी मंंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, पोलीसांनी तो हाणून पाडला. प्रवेशद्वारावरच आंदोलकांनी महाआरती केली. प्रदेश उपाध्यक्ष बसवराज मंगरुळे, प्रदेश सचिव प्रवीण घुगे, मराठवाडा संघटनमंत्री भाऊराव देशमुख, अध्यात्मिक आघाडी मराठवाडा संयोजक संजय जोशी, राजेश मेहता, राजू शिंदे, शिवाजी दांडगे, लक्ष्मीकांत थेटे, अजय शिंदे, अरुण पालवे, प्रवीण कुलकर्णी, सविता कुलकर्णी, ताराचंद गायकवाड, मनीषा भन्साळी, अमृता पालोदकर, रामेश्वर भादवे, मनोज भारस्कर, मनीषा मुंडे, अशोक दामले, संतोष पाटील, संजय जोरले, दीपक बनकर, सागर पाले, गोविंद केंद्रे, दयाराम बसये, रामचंद्र नरोटे, मंगलमूर्ती शास्त्री आदींनी आंदोलनात सहभाग घेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
मद्यालये सुरू आणि देवालये बंद
प्रदेश सरचिटणीस आ.अतुल सावे म्हणाले, पूर्ण देशांत मंदिरे खुली केली आहेत. राज्यसरकारने मद्यालये खुली केले आहेत, आणि देवालये बंद ठेवली आहेत. जर श्री गणेशोत्सवापर्यंत मंदिर खुली करण्याचा निर्णय घेतला नाही, तर सर्व भक्तांना घेऊन कुलूपं तोडून मंदिरात प्रवेश करण्याचा इशारा त्यांनी दिला. इतर धार्मिक स्थळे खुले आहेत, आणि फक्त मंदिरे बंद आहेत. हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. वारकऱ्यांना सोबत घेऊन यापुढे आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा केणेकर यांना दिला.