‘स्वाराती’ रुग्णालयात ३५ वर्षानंतर ओपन हार्ट सर्जरी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:24 AM2018-08-25T00:24:40+5:302018-08-25T00:26:40+5:30
येथील स्वा.रा.ती. रुग्णालयातील सर्जरी विभागांतर्गत हृदयविकारावर शस्त्रक्रियेची ३५ वर्षांनंतर सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिली ‘ओपन हार्ट सर्जरी’ यशस्वी पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबाजोगाई : येथील स्वा.रा.ती. रुग्णालयातील सर्जरी विभागांतर्गत हृदयविकारावर शस्त्रक्रियेची ३५ वर्षांनंतर सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी पहिली ‘ओपन हार्ट सर्जरी’ यशस्वी पार पडली.
लातूर येथील हृदय शल्यचिकीत्सक डॉ.सयाजी सरगर यांच्यासह विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे, डॉ.सतिश गिरेबोईनवाड यांच्या सर्जन टीमने ही अवघड सर्जरी पार पाडली. या शस्त्रक्रियेसाठी भूलरोग तज्ञ म्हणून डॉ.गणेश निकम, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. देवानंद पवार, डॉ. प्रसाद सुळे आदींनीही योगदान दिले.
इफ्तेखार मणियार (वय २२ वर्ष, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) या गरीब परिस्थितीतील युवकावर जन्मत: हृदयविकार असलेला ‘पेटन्ट डक्टस् आर्टेरियस’ नामक आजारावर उपचाराचा भाग म्हणून ही शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जन्मत: हा आजार होतो. परंतु बालवयात शस्त्रक्रियेअभावी रुग्ण दगावण्याचे प्रमाण प्रचंड असल्याने तरुणांमध्ये हा आजार आढळणे वैद्यकीयदृष्ट्या अतिशय दुर्मिळ बाब आहे.
पस्तीस वर्षांमध्ये प्रथमच झालेली सदरील दुर्मिळ प्रकारची शस्त्रक्रिया यशस्वी होणे ही मोठी आनंददायक घटना असून हृदयावरील याहून मोठ्या बायपाससारख्या शस्त्रक्रियांसाठी आम्ही सज्ज आहोत असा विश्वास अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी व्यक्त केला.
स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ही ओपन हार्ट सर्जरी ऐतिहासिक आहे, या शब्दांत रुग्णालयाच्या अभ्यागत समितीच्या अध्यक्षा खा. डॉ.प्रितम मुंडे यांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सुधीर देशमुख, सर्जरी विभागाचे विभागप्रमुख डॉ.नितीन चाटे तसेच हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ.सयाजी सरगर यांचे कौतूक केले आहे. सदरील रुग्ण इफ्तीकार वरील ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, त्याची तब्येत वेगाने सुधारत आहे.
अंबाजोगाईतील स्वाराती ग्रामीण रुग्णालयाला ६० वर्षे झाली आहेत. तर स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयास ३५ वर्षे झाली. यंत्रणा तोकडी असल्याने मोठ्या व गंभीर शस्त्रक्रिया होण्यास सुविधांसह मानसिक धैर्य कमी पडत होते.
अलिकडच्या काही वर्षात सुविधा उपलब्ध झाल्याने इथेच शिक्षण घेतलेले डॉ. नितीन चाटे यांनी ओपन हार्ट सर्जरीचे धाडस केले. अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी संपूर्ण सहकार्य केले. त्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली.