‘एसईबीसी’ऐवजी ‘खुला’; ‘आयटीआय’ प्रवेशासाठी मराठा आरक्षण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 05:11 PM2020-11-28T17:11:44+5:302020-11-28T17:15:31+5:30
दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज मागविले होते.
औरंगाबाद : ‘आयटीआय’ची पहिली प्रवेशफेरी पूर्ण झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे संपूर्ण प्रवेशप्रक्रियाच ठप्प झाली होती. तथापि, ज्या विद्यार्थ्यांनी ‘आयटीआय’साठी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून ऑनलाईन अर्ज केले होते. त्यांनी आपल्या अर्जात खुला प्रवर्ग अशी दुरुस्ती करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे.
दहावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर राज्यातील ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांकडून ऑगस्ट महिन्यात ऑनलाईन अर्ज मागविले होते. त्यानुसार उमेदवारांची अंतिम गुणवत्ता यादी ५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर ८ सप्टेंबर रोजी पहिल्या फेरीसाठी निवड यादी जाहीर करण्यात आली. दरम्यान, ९ ते १४ सप्टेंबर या कालावधीत झालेल्या पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चित करण्यात आले होते.
मराठवाड्यातील शासकीय व खाजगी ‘आयटीआय’मध्ये एकूण १९ हजार ३४४ प्रवेशक्षमतेपैकी पहिल्या फेरीत ३ हजार ५८४ प्रवेश झाले होते. त्यानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली; परंतु मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज करताना तो ‘एसईबीसी’ या प्रवर्गातून केला होता. त्यामुळे दुसरी फेरी स्थगित करण्यात आली होती. आता राज्य शासनाने मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गातून प्रवेश देण्याचा निर्णय घेतल्यामुळे ‘आयटीआय’साठी ऑनलाईन अर्जात दुरुस्ती करण्यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. ज्या उमेदवारांनी ‘एसईबीसी’ प्रवर्गातून अर्ज केला असेल, त्यांनी प्रवेश अर्जात खुला प्रवर्ग अशी दुरुस्ती करायची आहे.
प्रवेशफेरीला ३ डिसेंरपासून सुरुवात
दुसऱ्या प्रवेशफेरीला ३ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. सायंकाळी ५ वाजेपर्यंत निवड यादी संकेतस्थळावर जाहीर केली जाणार असून ४ डिसेंबर रोजी संस्था व व्यवसायनिहाय निवड यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. ५ ते ८ डिसेंबरदरम्यान निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेशनिश्चित केला जाणार आहे. तिसऱ्या फेरीसाठी ११ डिसेंबर रोजी संस्था व निवड यादी जाहीर केली जाईल. १२ ते १५ डिसेंबरदरम्यान तिसऱ्या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी व प्रवेश निश्चित करण्यात येणार आहेत. १२ ते १५ डिसेंबर दरम्यान, चौथ्या फेरीसाठी विकल्प सादर करता येतील. १८ डिसेंबर रोजी चौथ्या फेरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची संस्था व व्यवसायनिहाय यादी जाहीर होईल. चौथ्या प्रवेशफेरीअखेर रिक्त जागांवर समुपदेशनाद्वारे २९ व ३० डिसेंबर रोजी प्रवेश दिले जाणार आहेत.