ओपन स्पेस दिला चक्क भाडेतत्त्वावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 01:06 AM2017-09-27T01:06:03+5:302017-09-27T01:06:03+5:30
सिंधी कॉलनी येथील सोसायटीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेली खुली जागा काही व्यक्तींनी एका केटरर्स चालकाला दरवर्षी १८ लाख रुपये प्रमाणे भाडेतत्त्वावर दिल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सिंधी कॉलनी येथील सोसायटीने महापालिकेकडे हस्तांतरित केलेली खुली जागा काही व्यक्तींनी एका केटरर्स चालकाला दरवर्षी १८ लाख रुपये प्रमाणे भाडेतत्त्वावर दिल्याची खळबळजनक बाब समोर आली आहे. मागील दोन महिन्यांपासून सोसायटीतील त्रस्त नागरिक महापालिकेकडे तक्रार करीत आहेत; मात्र महापालिका प्रशासन राजकीय दबावापोटी कोणतीच कारवाई करायला तयार नाही.
सिंधी कॉलनी येथील सीटीएस क्रमांक १४९५१ मध्ये १८७ प्लॉटच्या रेखांकनाला महापालिकेने मंजुरी दिली आहे. सोसायटीने एकूण १४ एकर जागेमध्ये तीन ओपन स्पेस सोडले आहेत. त्यातील जालना रोडलगत १६ हजार चौरस फुटाचा एक ओपन स्पेस आहे. मागील अनेक वर्षांपासून सोसायटीतील नागरिक, ज्येष्ठ नागरिक या ओपन स्पेसचा वापर करीत होते. अलीकडेच सोसायटीमधील काही व्यक्तींनी ओपन स्पेसवर विना परवानगी बांधकाम केले. चार दुमजली खोल्या बांधण्यात आल्या. मैदानावर भव्य-दिव्य मंडप उभारण्यात आला आहे. ही संपूर्ण जागा गुरुकृपा केटरर्सला दरवर्षी १८ लाख रुपयांप्रमाणे भाडेतत्त्वावर देण्यात आल्याचा आरोप सोसायटीमधील नागरिकांनी मनपा आयुक्तांकडे केला आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात सोसायटीच्या सदस्यांनी नमूद केले की, केटरर्स चालक दररोज येथे व्यावसायिक कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ओपन स्पेस सोसायटीच्या मालकीचा असून, महापालिका केअर टेकर आहे. मागील काही दिवसांपासून ओपन स्पेसवर बांधकाम होत असतानाही महापालिकेकडे तक्रार करण्यात आली. त्याचीही दखल प्रशासनाने घेतली नाही. आता संपूर्ण मैदान केटरर्स चालकाने व्यापून टाकले आहे. सोसायटीच्या एकाही व्यक्तीला ओपन स्पेसवर पाय ठेवण्याची मुभा नाही. स्वत:च्या मालकीचा भूखंड असल्याप्रमाणे केटरर्स चालक वागत आहे. मागील दोन महिन्यांपासून सोसायटीतील नागरिक महापालिका प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथक राजकीय दबावापोटी कोणतीही कारवाई करायला तयार नाही.