खुल्या जागा, छोटी उद्याने देणार दत्तक
By Admin | Published: April 17, 2016 01:28 AM2016-04-17T01:28:40+5:302016-04-17T01:36:53+5:30
औरंगाबाद : महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविणे अशक्य होते. २०१२ मध्ये मनपाने शहरातील चौक, दुभाजक दत्तक देण्याची योजना आणली होती.
औरंगाबाद : महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने अनेक सामाजिक उपक्रम राबविणे अशक्य होते. २०१२ मध्ये मनपाने शहरातील चौक, दुभाजक दत्तक देण्याची योजना आणली होती. या उपक्रमाला अनेक संस्था, कंपन्यांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे आता मनपाने शहरातील छोटी-छोटी उद्याने, ले-आऊटमधील ओपन स्पेस दत्तक देण्याची योजना आणली आहे. २० एप्रिल रोजी मनपाच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाने हा ठराव मंजुरीसाठी ठेवला आहे.
शहरात मनपाच्या मालकीचे १०० पेक्षा अधिक उद्याने आहेत. या उद्यानांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी कर्मचारी नाहीत. उद्यान विकसित करण्यासाठी आर्थिक तरतूदही नाही. त्याचप्रमाणे अनेक ले-आऊटमधील सोसायटीत एक किंवा दोन ओपन स्पेस आहेत. या ओपन स्पेसवर मनपाची मालकी असली तरी वॉल कम्पाऊंड उभारण्यासाठी मनपाकडे निधी नाही. सोसायटीमधील ओपन स्पेसवर अतिक्रमणे वाढत आहेत. ज्या उद्देशासाठी ओपन स्पेस आरक्षित ठेवण्यात आले आहेत, त्या उद्देशाला तडा न जाता जागा विकसित करण्याचा विचार प्रशासनाने सुरू केला आहे. शहरात ले-आऊटमधील किमान ५०० पेक्षा अधिक ओपन स्पेस पडून आहेत. विविध संस्था, बिल्डर्स, खाजगी कंपन्या यांच्या सहकार्याने उद्याने, ओपन स्पेस विकसित करण्याचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला आहे.
सर्वसाधारण सभेने मंजुरी दिल्यावर ओपन स्पेस आणि उद्याने ‘सीएसआर’उपक्रमात दत्तक देण्यात येणार आहेत. ज्या कंपनीला उद्यान किंवा ओपन स्पेस देण्यात येईल तेथे कंपनीला फक्त आपला बोर्ड लावण्याची परवानगी मनपा देईल. उद्यानात तिकीट लावून पैसा कमविणे, ओपन स्पेसवर जाहिराती लावून पैसे मिळविणे आदी कामे अजिबात करता येणार नाहीत. सामाजिक बांधिलकी म्हणून कंपन्यांना संबंधित जागा विकसित करता येईल.