उद्घाटन वादावरील पडदा उठेना; २३ डिसेंबरचा कार्यक्रमही अनिश्चित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2018 10:46 PM2018-12-20T22:46:07+5:302018-12-20T22:47:17+5:30
१०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, शहर बससेवा, एसटीपीच्या लोकार्पणास शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरील पडदा अजून काही उठेना.
औरंगाबाद : १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन, शहर बससेवा, एसटीपीच्या लोकार्पणास शिवसेनेने युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना निमंत्रित केल्यामुळे महापालिकेच्या राजकारणात सेना-भाजपमध्ये सुरू असलेल्या वादावरील पडदा अजून काही उठेना. शिवसेनेने दोन पावले मागे घेऊन १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन जानेवारी महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि एसटीपी, बससेवेचे लोकार्पण २३ डिसेंबर रोजी ठाकरे यांच्या हस्ते करण्याचा निर्णय घेतला असला तरी तो कार्यक्रमही अद्याप अनिश्चित आहे.
महापौर नंदकुमार घोडेले यांच्याकडून शिवसेना आणि भाजप नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते म्हणाले, रस्त्यांच्या भूमिपूजनात तांत्रिक अडचण आली आहे. कंत्राटदारांच्या वादामुळे रस्त्यांचे भूमिपूजन लांबण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे यांची वेळ आधीच घेतलेली असल्याने रविवारी २३ तारखेला शहर बससेवा व कांचनवाडीतील एसटीपीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते केले जाईल.
बुधवारी महापालिकेच्या शिष्टमंडळाची भेट मुख्यमंत्र्यांनी टाळल्याने गुरुवारी दिवसभर सेना विरुद्ध भाजप, असे दोन गट पालिकेत होते. १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन करण्यासाठी जानेवारीत मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो कार्यक्रम घ्यावा लागेल, अन्यथा मोठ्या आर्थिक विवंचनेला मनपाला सामोरे जावे लागेल, असा गर्भित इशारा भाजपने सेनेला दिला आहे.
खा.चंद्रकांत खैरे यांनीच २३ डिसेंबर रोजी तिन्ही कार्यक्रमांचे भूमिपूजन होणार असल्याचे जाहीर करून ठाकरे येणार असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी मुख्यमंत्र्यांची वेळ घेणे गरजेचे होते. मात्र, शिवसेनेने त्याला महत्त्व दिले नाही. परिणामी भाजप आणि शिवसेनेत राजकीय वाद पेटला. भाजपची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सेना-भाजपचे शिष्टमंडळ बुधवारी मुंबईला गेले; परंतु ते शिष्टमंडळ मुख्यंमत्र्यांना भेटू शकले नाही. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात रस्त्यांचे भूमिपूजन करण्यासाठी येता येईल, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी महापौरांपर्यंत भाजप नेत्यांपर्यंत पोहोचविला.
प्रशासनावर भाजपचा दबाव?
जीएसटीचा तिढा सुटेपर्यंत काम सुरू न करण्याची कंत्राटदारांची भूमिका आहे. जीएसटीचे नाव पुढे करून प्रशासनावर भाजप वरिष्ठ पातळीवरून दबाव आणत असल्याची चर्चा आहे. १०० कोटींच्या रस्त्यांत जीएसटीची टक्केवारी अचानक वाढलेली नाही. जीएसटी नियमाप्रमाणेच आहे. परंतु मुख्यमंत्र्यांच्या हस्ते एक तरी मोठे भूमिपूजन शहरात व्हावे, अशी भूमिका भाजपची असल्यामुळे कंत्राटदार, जीएसटीचा वाद जन्माला घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान महापौर म्हणाले, अद्याप जीएसटीचा वाद मिटला नसल्याचे कळले आहे. त्यामुळे १०० कोटींच्या रस्त्यांचे भूमिपूजन भाजप पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वेळेनुसार होईल.
बस येण्यात पासिंगची अडचण
२३ तारखेलाच पाच बस मनपात येण्यात पासिंगची अडचण आहे. त्यामुळे बस येण्याची शक्यता कमी आहे. महापौरांनी अतिरिक्त आयुक्त संतोष कवडे यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी रविवारी सकाळी १० वाजेपर्यंत शहरात बस येतील, असे दबावात बोलल्याप्रमाणे सांगितले. जर बस त्या दिवशी उशिराने आल्या तर मोठे संकट उभे राहील. त्यामुळे २२ डिसेंबरपर्यंत बस आल्याच पाहिजेत, असे महापौरांनी कंपनीच्या प्रतिनिधींना फोनवरून सांगितले.
प्रदेशाध्यक्षांचे मौन
भाजप प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांना १०० कोटींच्या रस्ते कामाचे भूमिपूजन तरी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केले जावे. याबाबत तुमचे मत काय, यावर खा.दानवे यांनी काहीही प्रतिक्रिया न देता रामनगर येथून काढता पाय घेतला.