खुलेआम ओव्हरलोड वाहतूक...
By Admin | Published: March 29, 2017 12:20 AM2017-03-29T00:20:08+5:302017-03-29T00:20:41+5:30
जालना : शहर परिसरातून चार वळण रस्त्यांवर क्षमतपेक्षा अधिक वजन वाहतूक करण्याची स्पर्धाच लागली आहे.
जालना : शहर परिसरातून चार वळण रस्त्यांवर क्षमतपेक्षा अधिक वजन वाहतूक करण्याची स्पर्धाच लागली आहे. ओव्हरलोड वाहतूक करून शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडविला जात आहे. आरटओंच्या पथकालाही हुलकावणी देत ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्यांची दहशत वाढली असल्याचे लोकमतने सोमवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उघड झाले.
अनेक वाहनांची वजन वाहून नेण्याची क्षमता नसतानाही क्षमतेपेक्षा दोन ते तीन पट वजन वाहून नेण्याची स्पर्धाच सुरू आहे. महाराष्ट्रासोबतच परराज्यांतील शेकडो वाहनांतून सर्रास वाहतूक सुरू आहे. जालना शहरातील देऊळगावराजा चौफुली, मंठा चौफुली, औरंगाबाद चौफुली दररोज शेकडो वाहने दिसून येतात. नागपूर, हैदराबाद, सोलापूर आदी महानगरांकडे जालन्यातील वळण रस्त्यांवरून वाहतूक होते. दिवसाकाठी दीड हजारपेक्षा अधिक तर रात्री अडीच ते तीन हजार ट्रक, टेंपो आदी वाहनांतून मालवाहतूक करण्यात येते. यात प्रामुख्याने धान्य, सिमेंट तसेच अन्य साहित्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे प्रत्येक ट्रक ताडपत्रीने बांधलेला असल्यामुळे वजन करण्याचे कष्ट आरटीओ अथवा पोलीस टाळतात. याचा फायदा ट्रक चालक घेत आहेत. वाळू वाहतुकीतून सर्वात जास्त वजनांचे नियम मोडीत काढले जात आहेत. टिप्पर अथवा ट्रॅक्टरमधून वाळू वाहतुकीने सर्वांनाच जेरीस आणले आहे. वाळू वाहतूकदार क्रमांक न लिहिताच अथवा तो पुसट करून वाहतूक करीत आहेत. यामुळे तहसील अथवा पोलिसांना कारवाई करताना अडचण येत आहे. अतिक्ति भार आणि भरधावामुळे वाळू टिप्परमधून अपघातांची संख्या गत काही महिन्यांत वाढल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. वळण रस्त्यांवर महामार्ग पोलीस असले तरी त्यांचे काम क्रमांक नसणे, कागदपत्र तपासणे आदी कामे येतात. ओव्हरलोड तपासण्याचा अधिकार त्यांना नसल्याचे आरटीओंनी सांगितले. (प्रतिनिधी)