‘आॅपरेशन आॅल आऊट’चा धसका
By Admin | Published: January 28, 2017 11:51 PM2017-01-28T23:51:14+5:302017-01-28T23:52:27+5:30
बीड : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ या नागपूर पॅटर्नने अवैध धंदेवाल्यांना पळता भुई थोडी झाली
बीड : पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या ‘आॅपरेशन आॅल आऊट’ या नागपूर पॅटर्नने अवैध धंदेवाल्यांना पळता भुई थोडी झाली आहे. मागील दहा दिवसांमध्ये जुगार व अवैध दारू विक्री विरोधात अनुक्रमे १३३ व २३३ असे मिळून ३६६ जणांना जेलची हवा खावी लागली आहे.
नागपूरहून आलेल्या जी. श्रीधर यांनी ‘आॅपरेशन आॅल आऊट’ ही नवीन मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत एकाचवेळी सर्व ठाण्यांमधील पोलीस कर्मचारी मध्यरात्री रस्त्यावर उतरून कायदा व सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्यांवर धडक कारवाई केली जाते. आतापर्यंत दोनदा ही मोहीम राबविण्यात आली आहे. जुगार प्रकरणामध्ये १ लाख ६० हजार ७१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अवैध दारू प्रकरणामध्ये ३ लाख ४४ हजार ८८२ रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांसह बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवरही बडगा उगारण्यात आला आहे. आतापर्यंत दोन बेकायदेशीर पिस्टल हस्तगत करण्यात आल्या आहेत. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध देखील कारवाई झाली असून, अवैध वाहतुकीलाही चाप बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
सर्व ठाणेप्रमुखांना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर सतर्क राहण्याच्या सूचना अधीक्षक श्रीधर यांनी दिल्या आहेत. (प्रतिनिधी)