बालिका विद्यालयाच्या रुपांतरास कर्मचाऱ्यांचा विरोध
By Admin | Published: February 17, 2016 11:03 PM2016-02-17T23:03:44+5:302016-02-17T23:12:26+5:30
परभणी : जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे रुपांतर मॉडेल थ्रीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला
परभणी : जिल्ह्यातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचे रुपांतर मॉडेल थ्रीमध्ये करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, या निर्णयामुळे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात वर्षानुवर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय होणार असल्याने या निर्णयास विरोध दर्शविण्यात आला आहे़
परभणी येथे कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय कार्यरत आहे़ या शाळेमध्ये जिल्ह्यातील शाळाबाह्य, दारिद्र्य रेषेखाली आणि दुर्गम भागातून येणाऱ्या मुलींना शिक्षण दिले जात आहे़ शासनाच्या निर्णयानुसार राज्यभरात आणि परभणी जिल्ह्यात ही शाळा कार्यरत झाली़ या शाळेंतर्गत विद्यार्थिनींच्या शिक्षणाबरोबरच निवास आणि भोजनाची व्यवस्थाही केली जाते़ शाळाबाह्य मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्याचे काम या शाळेमार्फत करण्यात येते़ शाळेत कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गुणवत्ता प्राप्त केली आहे़ या विद्यार्थिनी नियमित शाळेप्रमाणे दर्जेदार शिक्षण या शाळेत घेत आहेत़ यासाठी विद्यालयातील शिक्षकांचे प्रयत्न कारणीभूत आहेत़ मागील अनेक वर्षांपासून शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून विद्यार्थी घडविले आहेत़ परंतु, काही दिवसांपूर्वी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय हे मॉडेल- ३ मध्ये रुपांरित करण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती मिळाली़ असा निर्णय झाल्यानंतर वर्षानुवर्षांपासून या शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे़ त्यामुळे या निर्णयास शाळेतील कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे़ या शाळेत काम करणारे सर्व कर्मचारी कंत्राटी स्वरुपात काम करतात़ निर्णय झाल्यास या कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार आहे़ त्यामुळे निर्णयास विरोध करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)