सत्तारांना संधी की भाजपचा विरोध? मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय शिरसाटांना मंत्रीपदाची हुलकावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 12:05 PM2022-08-10T12:05:52+5:302022-08-10T12:06:42+5:30
सलग तीन टर्म आमदार असलेल्या शिरसाट यांना आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. हे त्यांच्या बंडखोरीचे एक कारण समजले जात होते.
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे म्हणून ओळखले जाणारे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव मंत्रिमंडळ विस्तारात ऐन वेळी कापले गेल्याने ते नाराज झाल्याची चर्चा आहे. दरम्यान, अब्दुल सत्तारांना ऐनवेळी संधी की शहरात भाजपाला दुसरे शक्तीकेंद्र नको म्हणून विरोध झाल्याची शक्यता यामुळे शिरसाटांची मंत्रीपदाची संधी हुकली अशी चर्चा सुरु आहे.
शिरसाट यांनी नाराज नसल्याचे सांगितले असले तरी त्यांच्या कार्यालयात मंगळवारी मात्र शुकशुकाट दिसून आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसेनेसोबत बंडखोरी करीत ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले होते. यानंतर आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. या बंडखोर आमदारांमध्ये आ. शिरसाट हे अग्रभागी होते. बंडखोरीनंतर त्यांनी शिंदे यांचे नेतृत्व योग्य असल्याचे सांगून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भेटत नव्हते, आघाडी सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या आमदारांना विकास निधी मिळत नव्हता. केवळ राष्ट्रवादीच्या लोकांनाच निधी देण्यात येत होता, अशी टीका केली होती. संजय राऊत यांच्यावरही ते जाहीर टीका करायचे. सलग तीन टर्म आमदार असलेल्या शिरसाट यांना आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाले नव्हते. हे त्यांच्या बंडखोरीचे एक कारण समजले जात होते.
एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जात असल्याने मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना स्थान मिळेल, अशी सकाळपर्यंत शक्यता वर्तविली जात होती. शिरसाट यांनाही त्यांचा पत्ता कट होईल, असे वाटले नव्हते. यामुळे त्यांनी त्यांच्या कुटुंबाला काल मुंबईला बोलावून घेतले होते. सकाळी मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी अचानक त्यांना मंत्रिपद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर टीईटी घोटाळ्यात अब्दुल सत्तार यांच्या मुलींचे नाव आल्याने सत्तार यांचा पत्ता कट होईल आणि शिरसाट यांना मंत्री केले जाईल, अशी चर्चाही राजकीय वर्तुळात होती. मात्र ऐन वेळी शिरसाट यांचे नाव नसल्याने ते नाराज झाल्याची चर्चा सुरू झाली. शिरसाटही प्रसारमाध्यमांशी बोलताना ते नाराज नसल्याचे म्हणाले. मात्र त्यांचे समर्थक नाराज झाले. कोकणवाडीतील त्यांच्या कार्यालयातही मंगळवारी शांतता पाहायला मिळाली.
समर्थकांमध्ये नाराजी
मुख्यमंत्र्यांचे जवळचे असल्याने आ. शिरसाट यांचे मंत्रिपद पक्के असल्याची आशा त्यांच्या समर्थकांना होती. मंगळवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे समजताच त्यांचे अनेक समर्थक मुंबईला गेले होते. मात्र त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याचे बोलले जात आहे.
सत्तारांना संधी की भाजपचा विरोध
मंत्रिमंडळात शिंदे गटाकडून पैठणचे संदिपान भुमरे आणि औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांचे नाव पक्के समजले जात होते. मात्र, सत्तार पहाटे मुख्यमंत्री शिंदे यांना भेटले आणि शपथविधीच्या काही तास आधी शिरासाटांचे नाव वगळले गेले अशी चर्चा आहे. यासोबतच शहरात भाजपला सावे मंत्रीपदी असताना दुसरे मंत्रिपद नको होते यामुळे त्यांच्याकडूनही शिरसाट यांना विरोध झाला असल्याची शक्यता आहे.