कचरा डेपोसाठी एक इंचही जागा देणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 01:42 AM2017-10-17T01:42:42+5:302017-10-17T01:42:42+5:30
ग्रामस्थांनी घोषणाबाजी करीत आमच्या शिवारातील एक इंचही जागा कचरा डेपोसाठी देणार नाही, अशी भूमिका घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
दौलताबाद : औरंगाबाद महानगरपालिकेच्या कचरा डेपोसाठी अब्दीमंडी येथे मनपा व महसूल विभागाच्या अधिका-यांनी रविवारी (दि.१५) पाहणी केली. ही वार्ता अब्दीमंडी गावात पसरताच मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी जमा होत मनपा, महसूल प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करीत आमच्या शिवारातील एक इंचही जागा कचरा डेपोसाठी देणार नाही, अशी भूमिका घेतली. यावरून कच-याचा प्रश्न चांगलाच पेट घेण्याची शक्यता आहे.
औरंगाबाद महापालिकेच्या कचरा डेपोला शहरातील काही भागांतून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. त्या अनुषंगाने महापालिकेने कचरा डेपोसाठी जागा शोधण्याच्या कामाला गती दिली आहे. रविवार असताना महापालिका व महसूल विभागाच्या अधिकाºयांनी अब्दीमंडी परिसरातील जागेची पाहणी केली. ही माहिती काही गुराख्यांनी गावात दिली.
याबाबत ग्रामस्थांनी सरपंचांना विचारले. मात्र, त्यांनाही याची माहिती नसल्याने सरपंचासह ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला. आमच्या गाव शिवारात कचरा डेपोसाठी एक इंचही जागा देणार नाही, अशी भूमिका घेतली. मनपा प्रशासनाविरुद्ध तीव्र घोषणाबाजी केली.
या विषयी अब्दीमंडी येथे सोमवारी (ता.१६) आपत्कालीन ग्रामसभा बोलावून यात पुढील निर्णय घेतले जाणार आहेत. अब्दीमंडी परिसरात अनेक ऐतिहासिक दर्गाह आहेत.
कचरा डेपोमुळे त्यांना इजा पोहोचण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर परिसरात कचरा डेपोमुळे वायुप्रदूषण होण्याची शक्यता आहे. यामुळे अब्दीमंडी परिसरात कचरा डेपो उभारण्यास विरोध असल्याचे गावक-यांनी सांगितले.