प्लास्टिक बंदीच्या कारवाईला औरंगाबादच्या व्यापाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 12:20 AM2018-06-27T00:20:30+5:302018-06-27T00:21:39+5:30
प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापालिकेने सोमवारी दहा व्यापा-यांवर कारवाई केली. मात्र, या कारवाईला मंगळवारी कपडा, मिठाई, बेन्टेक्स ज्वेलरी व्यावसायिकांनी कडाडून विरोध दर्शविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : प्लास्टिक बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना महापालिकेने सोमवारी दहा व्यापा-यांवर कारवाई केली. मात्र, या कारवाईला मंगळवारी कपडा, मिठाई, बेन्टेक्स ज्वेलरी व्यावसायिकांनी कडाडून विरोध दर्शविला. उत्पादक कंपन्या आपला माल प्लास्टिक पॅकिंगमध्येच पाठवतात. त्यात व्यापाºयांचा काहीच दोष नाही, अशी भूमिका व्यापाºयांनी घेतली आहे.
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीची प्लास्टिक बॅग आढळून आल्यास महापालिका पाच हजार रुपये दंड आकारत आहे. या कारवाईमुळे व्यापाºयांमध्ये खळबळ उडाली आहे. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी थेट दुकानात घुसून कारवाईचा बडगा उगारत आहेत. दुकानात कॅरिबॅग असेल तर कारवाई करण्यात येत आहे. कंपन्यांनी पॅकिंग केलेले प्लास्टिकचे आवरण काढल्यास माल खराब होण्याची दाट शक्यता आहे. मंगळवारी कपडा, मिठाई आणि बेन्टेक्स ज्वेलरी विक्रेत्यांनी महापौर नंदकुमार घोडेले यांची भेट घेतली. काही साड्या कंपनीकडूनच प्लास्टिक आवरणासह पाठविण्यात येतात. ते प्लास्टिक आवरण काढताच येत नाही. काही मिठाईला पातळ कॅरिबॅग असते. मिठाई खराब होऊ नये, हा त्यामागचा हेतू असतो. बेन्टेक्स ज्वेलरीचाही असाच प्रकार आहे. दागिन्यांना चकाकी यावी म्हणून पॉलिश केलेली असते. पारदर्शक प्लॅस्टीकमध्ये पॅकिंग कंपनी करते. पॅकिंगमधून ज्वेलरी बाहेर काढल्यानंतर ती काळी पडण्यास सुरुवात होते.
मनपाकडून कारवाईचे समर्थन
राज्य शासनाने कारवाईचे निकष ठरवून दिले आहेत. कोणत्या कॅरिबॅगवर बंदी आहे, कोणत्या नाही, याची यादीच दिली आहे. त्यानुसार महापालिका कारवाई करीत आहे. यामध्ये फेरबदल करण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. काही उत्पादने त्यातून वगळावी, अशी विनंती व्यापाºयांनाच थेट शासनाकडे करावी लागेल, असे महापौरांनी नमूद केले.
महावीर पाटणी पथकप्रमुख
कॅरिबॅग बंदीसाठी महापालिकेने झोननिहाय पथक तयार केले आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून कालपर्यंत घनकचरा विभागाचे प्रमुख नंदकुमार भोंबे काम पाहत होते. पदाधिकाºयांच्या आग्रहावरून मंगळवारी प्रशासनाने वॉर्ड अधिकारी महावीर पाटणी यांची पथकप्रमुख म्हणून नियुक्ती केली.