विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं तीस-तीस घोटाळ्यात नाव? घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 01:23 PM2023-01-16T13:23:32+5:302023-01-16T13:24:35+5:30
राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्या होत्या.
औरंगाबाद: राज्यभर गाजलेल्या ३०-३० घोटाळ्याची माहिती ईडीने मागवली आहे. याच दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे नाव मुख्य आरोपीच्या डायरीत सापडल्याची माहिती आहे. या घोटाळ्यात आ. दानवे यांचे नाव आल्याने खळबळ उडाली आहे.
राज्यभर गाजलेल्या तीस- तीस घोटाळ्यात संतोष राठोड मुख्य आरोपी आहे. या घोटाळ्याशी संबंधित तीन डायऱ्या पोलिसांना सापडल्या होत्या. या डायऱ्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणाऱ्या लोकांची नावे आहेत. यातील एका डायरीतील यादीत आ. अंबादास दानवे यांचे देखील नाव असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी तीस-तीस घोटाळयाची कागदपत्रे ईडी ग्रामीण पोलिसांकड़ून नेली आहेत. यामुळे या घोटाळ्याची ईडीने चौकशी केली तर आ. दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाचा आणखी एक नेता ईडीच्या रडारवर असल्याची चर्चा आहे.
घोटाळ्यात अनेक राजकीय नेत्यांची नाव
तीसतीस घोटाळ्याच्या संबंधित डायरीत गुंतवणूकदारांची नावे आहेत. यात अनेक राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहिती आहे. ज्यात एका मंत्र्याचा नातेवाईक, एक आमदार, एक डीवायएसपी, एक सहायक पोलीस निरीक्षक, चार पोलीस कर्मचारी, दहा शिक्षक, परभणी जिल्ह्यातील एक माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक, कन्नड तालुक्यातील एक नगरसेवक, औरंगाबाद जिल्ह्यातील दोन सरपंच (एक सरपंच पती), दोन माजी जिल्हा परिषद सदस्य, एक पंचायत समिती सदस्य, एक ग्रामपंचायत सदस्य, एक शासकीय कंत्राटदार, तीन वाळू व्यावसायिक, एक पोलीस पाटील, एका पक्षाचा जिल्हाध्यक्ष, पाटबंधारे विभागाचा एक अधिकारी, एक बँक कर्मचारी आणि चार हॉटेल चालक यांची नावं आहे.
आ. अंबादास दानवे यांचा खुलासा
तीस-तीस घोटाळ्यात आ. अंबादास दानवे यांच्या नावाची चर्चा समोर आली. याबाबत एका वृत्त वाहिनीने आ. दानवे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. 'त्या डायरीत माझं नाव नाही, कोणी दुसरा दानवे असेल.' असा खुलास दानवे यांनी केला आहे.
काय आहे तीस-तीस घोटाळा.?
मराठवाड्यात समृद्धी महामार्ग आणि डीएमआयसी या प्रकल्पांमुळे कोट्यवधी रुपयांचा मोबदला शेतकऱ्यांना मिळाला होता. हेच लक्षात घेत औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील संतोष राठोड नावाच्या तरुणाने या शेतकऱ्यांना माझ्याकडे पैसे गुंतवा आणि मासिक ३० टक्के परतावा मिळावा अशी योजना आणली. सुरवातीला काही नातेवाईकांना या योजनेत घेऊन त्यांना चांगला परतावा दिला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी यात पैसा गुंतवला. यातून करोडेंची माया राठोडने जमा केली. मात्र, काही दिवसांनी राठोडने व्याज देणे बंद केले. त्यानंतर अनेकांनी गुंतवणूक परत मागितली तर पैसे देखील परत करण्यात आले नाही. यामुळे अखेर राठोड विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.