पात्रातील अतिक्रमणे काढण्यास विरोध
By Admin | Published: May 3, 2016 12:54 AM2016-05-03T00:54:22+5:302016-05-03T01:13:15+5:30
औरंगाबाद : खाम नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश नुकतेच मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले. त्यानुसार सोमवारी दुपारी मनपाचे अतिक्रमण
औरंगाबाद : खाम नदीपात्रातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश नुकतेच मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी दिले. त्यानुसार सोमवारी दुपारी मनपाचे अतिक्रमण हटाव पथक नदीच्या पात्रात पोहोचले. नागरिकांनी या कारवाईला कडाडून विरोध केला. १०० फुटांपर्यंतची अतिक्रमणे काढावीत, अशी मागणी नागरिकांनी केली. त्यामुळे मनपाचे पथक परतले.
सात-आठ वर्षांपूर्वी मनपाने तालुका भूमी अभिलेख विभागाकडून खाम नदीचे पात्र मोजून काढले होते. तालुका भूमी अभिलेख विभागाने नदीच्या पात्रात ठिकठिकाणी सिमेंटचे पोल लावले आहेत. या मार्किंगनुसार आजही शेकडो घरे त्यात येतात. २०११ मध्ये तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी नदीच्या पात्रात मोठी कारवाई केली होती. मागील आठवड्यात मनपा आयुक्त बकोरिया यांनी नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून देण्यासाठी कारवाई करावी, असा आदेश दिला. त्यानुसार सोमवारी उपायुक्त रवींद्र निकम, प्रभारी नगररचना सहसंचालक वसंत निकम आदी अधिकारी नदीपात्रात पोहोचले. जटवाडा भागात अगोदरच पाचशेहून अधिक नागरिक जमलेले होते. मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाला पाहून नागरिक अधिकच संतप्त झाले. या भागातील नगरसेवक रूपचंद वाघमारे यांनी नागरिकांची समजूत घातली. १०० फुटांपर्यंत कारवाईला आमचा कोणताही विरोध नाही. जहांगीर कॉलनी आदी भागात काही पत्र्याचे शेड लावलेली अतिक्रमणे आहेत. ती आम्ही स्वत:हून काढून घेण्यास तयार आहोत. नदीपात्राची मोजणी मनपाच्या नगररचना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली. मोजणी करून मनपाचे अतिक्रमण हटाव पथक परत फिरले.
खाम नदीपात्रातील पाण्याला नैसर्गिक प्रवाह मिळवून द्यावा, असे आदेश मनपा आयुक्तांनी दिले आहेत. सोमवारी आम्ही कारवाईसाठी जटवाडा भागात गेलो होतो. नागरिकांनी १०० फुटांपेक्षा अधिक कारवाई करू नये, अशी मागणी केली. त्याचप्रमाणे नदीपात्राला कायमस्वरूपी भिंत बांधून द्यावी, अशी विनंती केली. पात्र किती फूट ठेवायचे, कारवाई किती जणांवर करायची यासंदर्भात प्रशासनाने अजून कोणताही निर्णय घेतला नाही.
-रवींद्र निकम, उपायुक्त, मनपा