जायकवाडी जलाशयावरील सौरउर्जा प्रकल्पास विरोध; कहार समाजाचा पैठण येथे विराट मोर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2023 05:55 PM2023-10-09T17:55:17+5:302023-10-09T17:55:39+5:30
सौरउर्जा प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने लक्ष वेधून घेतले.
पैठण: जायकवाडी जलाशयावरील नियोजित सौरउर्जा प्रकल्पास विरोध करण्यासाठी सोमवारी पैठण येथे कहार समाज बांधवांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला. राज्यभरातून आलेला कहार समाज पैठण येथे एकवटल्याने कहार समाजाचा आतापर्यंत निघालेल्या मोर्च्यापैकी पैठण येथे सोमवारी काढण्यात आलेला सर्वात मोठा मोर्चा असल्याचे कहार समाज बांधवांनी सांगितले. दरम्यान या मोर्चात अंगावर खेकडे गळ्यात मासे व हातात मासे पकडण्याचे जाळे घेऊन अनेक कहार बांधव सहभागी झाले होते.
सौरउर्जा प्रकल्प रद्द करा अशा घोषणा देत निघालेल्या या मोर्चाने लक्ष वेधून घेतले. ईको सेन्सिटीव्ह झोन व पक्षी अभयारण्याच्या बंधनात अडकलेल्या जायकवाडी धरणावरील मच्छीमारा समोर प्रस्तावित सौरउर्जा प्रकल्पाचे नवीन संकट येऊ घातले आहे. यामुळे मासेमारी करणाऱ्या कहार समाजात अस्वस्थता पसरली आहे. नियोजित प्रकल्पास विरोध करण्यासाठी सोमवारी कहार समाजाच्या वतीने पैठण तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नाशिक, अहमदनगर, छत्रपती संभाजी नगर, बीड आदी जिल्ह्यातील कहार समाज बांधव पैठण येथे एकवटले होते. आप आपले व्यवसाय बंद ठेवून एक दिवस समाजासाठी देत मुले बाळे व कुटुंबासह समाजातील नागरिकांनी मोर्चात हजेरी लावल्याने सौरउर्जा प्रकल्पा बद्दल कहार समाजाचा मनात असणारी भिती व रोष मोर्चातून व्यक्त झाला.
रविवारी रात्री पासून कहार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने पैठण शहरात दाखल होण्यास प्रारंभ झाला होता. सोमवारी दुपारी येथील कै दिगंबरराव कावसानकर स्टेडियम पासून मोर्चाच प्रारंभ करण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी महिला भगिनी होत्या. मोर्चा विराट असल्याने सुमारे दोन तास मोर्चा मार्गातील वाहतूक ठप्प झाली होती. बसस्थानक, मार्गे मोर्चा तहसिल कार्यालयात नेण्यात आला तेथे नायब तहसीलदार मंगेश साबळे यांना महिला प्रतिनिधींनी समाजाच्या मागण्याचे निवेदन दिले.
या निवेदनात असे म्हटले आहे की, प्रकल्पातील हजारो हेक्टर पानपसाऱ्यावर अहमदनगर व संभाजीनगर जिल्ह्यातील कहार भिल्ल व भोई समाजासह इतर समाज पारंपारिक पद्धतीने मासेमारी करून उदरनिर्वाह चालवतात. या व्यवसायावर पंचवीस हजार कुटुंबे व त्यावर अवलंबून असलेल्या एक ते दीड लाख लोकांची उपजीविका चालते. जलाशयावर केंद्र व राज्य शासनाने तरंगता सौर प्रकल्प प्रस्तावित केला आहे. त्यामुळे जलाशयातील पाण्यातील मासेमारी संपुष्टात येऊन मच्छीमारावर कायमस्वरूपी उपासमारीची वेळ येणार आहे. यामुळे सौर पॅनल ऊर्जा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा असे निवेदनात म्हटले आहे.
पैठण शहरात मोठ्या संख्येने कहार समाज आहे. जायकवाडी धरणाच्या जलाशयावर मासेमारी करने हा या समाजाचा मुख्य व्यवसाय आहे. दरम्यान पक्षी अभयारण्य घोषित झाल्यानंतर वन खात्याने बंधने टाकून अनेक वेळा मच्छीमारावर कारवाई केल्याने मासेमारीचा व्यवसायास घरघर लागली आहे. त्यातच सौर उर्जा प्रकल्पाचे संकट येऊ घातल्याने समाजात मोठी अस्वस्थता पसरली आहे.