राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विक्रम काळे यांना विरोध, प्रदीप सोळुंके यांनीही मागितली उमेदवारी
By स. सो. खंडाळकर | Published: January 3, 2023 01:09 PM2023-01-03T13:09:28+5:302023-01-03T13:11:04+5:30
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचाही विक्रम काळे यांना विरोध असल्याचे समजते.
औरंगाबाद : या महिन्यात होणाऱ्या मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे काँग्रेसचे विद्यमान विक्रम काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विरोध होत आहे. दरम्यान, मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांचाही विक्रम काळे यांना विरोध असल्याचे समजते.
या मतदारसंघावर पूर्वी मराठवाडा शिक्षक संघाची पकड होती. डी. के. देशमुख, प. म. पाटील, पी. जी. दस्तुरकर, राजाभाऊ उदगीरकर यांनी या मतदारसंघावर विजय मिळवला होता, पण तो दिवंगत वसंत काळे यांनी रोखला. या निवडणुकीत सरळसरळ पक्षीय राजकारण सुरू झाले. एवढेच नव्हे तर निवडणूक म्हटल्यानंतर त्याला लागणाऱ्या सर्व गोष्टी सुरू झाल्या. त्यामुळे मराठवाडा शिक्षक संघाचे येथे काही चालले नाही. उमेदवार उभे राहत गेले, पण त्यांचा पराभव होत गेला.
पक्ष तिकीट नाकारणार नाही, ही अपेक्षा...
वडील वसंत काळे यांच्यानंतर विक्रम काळे यांनी या मतदारसंघावरची पकड घट्ट केली. शिक्षक दरबारसारखे उपक्रम राबविले. या मतदारसंघात अनेकदा त्यांनी संधी घेतली आणि ते विजयी होत गेले. यावेळेस विक्रम काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधूनच विरोध वाढतोय. राष्ट्रवादीच्या वक्ता सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रदीप सोळुंके यांनी प्रभावी काम केले. आता त्यांनी थेट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पत्र लिहून शिक्षक आमदारकीचे तिकीट मागितले आहे. त्यामुळे तिकीट मिळवण्यापासून चुरस निर्माण झालेली दिसते. पक्ष तिकीट कापणार नाही असे वाटते, असा विश्वास सोळुंके यांनी व्यक्त केला आहे. सोळुंके हे प्रसिद्ध व्याख्याते आहेत. डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेले आहे. राष्ट्रवादी शिक्षक संघटनेची स्थापना करून या संघटनेचेही अध्यक्षपद त्यांनी भूषविले. २००० मध्येच त्यांचा निवडणूक लढवण्याचा विचार होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट न मिळाल्यास काय करायचे याचाही ते विचार करीत आहेत. सध्या प्रदीप सोळुंके हे विक्रम काळे यांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत आहेत, अशी जोरदार चर्चा आहे.
माझ्याच कार्याचा परिणाम...
जयंत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात सोळुंके म्हणतात, राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात मराठवाडा शिक्षक मतदारसंघ येऊ शकतो, याकडे मी पक्षाचे लक्ष केंद्रित करून २००० मध्ये मी राष्ट्रवादी शिक्षक संघटना स्थापन करण्याची विनंती केली होती. त्यानुसार ८ फेब्रुवारी २००० रोजी मला पक्षाने या संघटनेचा अध्यक्ष म्हणून नियुक्तीपत्र दिले. माझ्या कार्याचा परिणाम म्हणून हा मतदारसंघ कायमचा आपल्या ताब्यात आहे, हे सांगायलाही सोळुंके विसरले नाहीत.