धसांच्या विकास कामांमुळे विरोधकांची दमछाक
By Admin | Published: August 11, 2014 12:17 AM2014-08-11T00:17:00+5:302014-08-11T00:19:23+5:30
धसांच्या विकास कामांमुळे विरोधकांची दमछाक
आष्टी : आचारसंहिता लागण्यापूर्वीच आष्टी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामाला आ़ सुरेश धस यांनी प्रारंभ केला आहे़ यामुळे विरोधकांची दमछाक होत असल्याचे चित्र आष्टी विधानसभा मतदारसंघात पहावयास मिळत आहे़
आष्टी विधानसभा मतदासंघात आ़ सुरेश धस यांनी मागील आठ ते दहा दिवसांत विविध विकास कामांचा धडाका सुुरु केला आहे़ यामध्ये ट्रामा केअर सेंटर, सभागृह, ग्रामीण भागातील अंतर्गत रस्ते, सभामंडप, मुलींसाठी वसतिगृह, सब-स्टेशन अशी विविध कामे मार्गी लावली आहेत़ याचाच परिणाम विरोधकांना आ़ धस यांच्यावर काय टीका करायची, असा प्रश्न भेडसावत असल्याचे पहावयास मिळत आहे़
आष्टी मतदारसंघातून आ़ धस हे मागील पंधरा वर्षांपासून आमदार आहेत़ त्यामुळे त्यांचा मतदारासंघातील प्रत्येकाशी जनसंपर्क आहे़ दोन दिवसापूर्वीच पाच कोटी रुपयांच्या कामाला प्रारंभ केला आहे़ यामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे़
१५ वर्षांमध्ये धस यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावाला काही ना काही मिळवून दिले आहे़ तसेच तेथील रस्ते, पाणी, वीज आदी मूलभूत प्रश्न सोडवले आहेत़ याचाच परिणाम मतदारसंघात धस यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असल्याने विरोधकांना आतापासूनच धडकी भरत आहे़ मतदारसंघातील मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न असो की, सर्वसामान्यांच्या आरोग्याचा, धस जातीने प्रश्न सोडविण्याकडे लक्ष देत असल्याचे नागरिक म्हणाले़ (वार्ताहर)