...अन् विद्यार्थी, शिक्षक बालंबाल बचावले
By Admin | Published: June 24, 2017 12:33 AM2017-06-24T00:33:27+5:302017-06-24T00:35:38+5:30
दुधड : वादळी वाऱ्यामुळे दुधड येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडाल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) दुपारी ४ वाजता घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
दुधड : वादळी वाऱ्यामुळे दुधड येथील जिल्हा परिषद शाळेवरील पत्रे उडाल्यामुळे मोठे नुकसान झाल्याची घटना गुरुवारी (दि.२२) दुपारी ४ वाजता घडली. सुदैवाने पत्रे उडालेतेव्हा शाळा सुटली होती. नसता अनर्थ घडला असता. या घटनेनंतर शालेय समितीने शुक्रवारी (दि.२३) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
याबाबत अधिक महिती अशी की, दुधड येथील जि.प. शाळेत १ ली ते ८ वी वर्ग आहेत. गुरुवारी नेहमीप्रमाणे शाळा भरली होती. दुपारी ४ वाजता शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी, तसेच शिक्षक आपापल्या घरी रवाना झाले. दरम्यान, याच वेळी आलेल्या जोरदार वादळामुळे येथील जि.प. शाळेच्या तीन खोल्यांवरील पत्रे उडाले. त्यामुळे शाळेच्या भिंती, पत्रे, विद्युत वायर, फॅन, शालेय साहित्य याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
नागरिकांनी सांगितले की, ही घटना जर १० ते १५ मिनिटे आधी झाली असती तर विद्यार्थ्यांसह शिक्षकांना मोठी इजा झाली असती; मात्र सुदैवाने शाळा सुटल्यानंतर सदर घटना घडल्यामुळे अनेक पालकांसह शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. गुरुवारी झालेल्या या घटनेमुळे शिक्षकांसह, पालक, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीने शुक्रवारी (दि.२३) शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
विशेष म्हणजे गत आठवड्यातही वादळी वाऱ्यामुळे शाळेच्या पाच वर्गखोल्यांवरील पत्रे उडाले होते. यानंतर मुख्याध्यापक व शालेय समितीने उडालेले पत्रे दुरुस्त करून घेतले होते; मात्र गुरुवारी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वादळाच्या भीतीने विद्यार्थी शाळेत जाण्यास तयार नसल्याने शुक्र वारी शाळा बंद होती. दरम्यान, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष पांडुरंग चौधरी यांनी सांगितले की, एकाच आठवड्यात दोनदा शाळेचे पत्रे उडाल्यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण पसरले असून, विद्यार्थी शाळेत येण्यास तयार नाहीत. मागील आठवड्यात उडालेल्या पत्राच्या खोलीचा पंचनामा केलेला आहे; परंतु अद्यापही कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.