अवैध वाळूबाबत कारवाईचे आदेश
By Admin | Published: August 19, 2016 01:00 AM2016-08-19T01:00:40+5:302016-08-19T01:03:24+5:30
औरंगाबाद : वाळूपट्टे बंद असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते.
औरंगाबाद : वाळूपट्टे बंद असताना शहरात मोठ्या प्रमाणात वाळूची वाहतूक सुरू असल्याचे दिसून येते. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत विविध ठिकाणी साठवून ठेवलेले साठे महसूल विभागाच्या मदतीने जप्त करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गुरुवारी वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांना दिले.
वाळूज परिसरातील नगर रोडवर भरधाव वाळूच्या ट्रकने दुचाकीस्वार तरुणांना चिरडल्याची घटना घडली. या घटनेनंतर पोलीस आयुक्तांनी शहर, छावणी, सिडको आणि वाळूज वाहतूक शाखेच्या पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना आयुक्त म्हणाले की, बैठकीत वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवरील कारवाईसंदर्भात चर्चा झाली.
यावेळी अधिकाऱ्यांनी औरंगाबाद आणि शेजारील जिल्ह्यातील वाळूपट्ट्यातील वाळू उत्खनन बंद आहे. असे असताना शहराच्या परिसरात वाळूचे साठे करून ठेवण्यात आलेले आहेत. या साठ्यातूनच नियमित वाळू शहरात पाठविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा अशा प्रकारचे अवैध वाळूसाठे शोधून महसूल विभागाच्या मदतीने त्यावर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आल्याचे आयुक्त म्हणाले. वाळूज ते गोलवाडी फाट्यापर्यंत अनेक ठिकाणी दुभाजक तुटलेले आहेत. त्यातून वाहनचालक रस्ता ओलांडत असतात. अशा ठिकाणीही अपघाताच्या घटना घडतात. त्यामुळे या रस्त्यावरील तुटलेल्या दुभाजकांचे सर्वेक्षण करून ते जोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची मदत घेण्याचे आदेश देण्यात आले आहे. एमआयडीसीमधील कंपन्यांसमोर दुभाजक रस्ता केलेला असतो. याबाबत कंपनी व्यवस्थापनासोबत चर्चा करून दुभाजक बंद करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.